आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या महत्वाच्या आरोग्यविषयक प्रकल्पांच्या प्रगतीचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा


मार्च 2027 पर्यंत, पहिल्या टप्प्यातली 160 रुग्णालये केली जाणार मजबूत; आपत्कालीन आणि ‘ट्रॉमा केअर’ सुविधांची क्षमता वाढवण्यावर भर

Posted On: 27 AUG 2026 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

अर्थसंकल्प 2026- 27 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेले महत्वाचे प्रकल्प आणि उपक्रमांच्या प्रगतीचा आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आढावा घेतला. या बैठकीत, या प्रकल्पांची कालबद्ध अंमलबजावणी, प्रभावी आंतरमंत्रालयीन समन्वय आणि मोजता येण्याजोगे परिणाम साध्य करणे, यावर भर देण्यात आला.

आढावा बैठकीदरम्यान, नड्डा यांनी मंत्रालयाच्या विविध विभागांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीच्या कामांचाही आढावा घेतला. अर्थसंकल्पातील घोषणांचे रूपांतर, निश्चित कालमर्यादेत ठोस कार्यक्रम, संस्था सक्षम करणे आणि वाढीव आरोग्यसेवा क्षमता यामध्ये झाले पाहिजे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

यावेळी नड्डा यांनी, जिल्हा रुग्णालयांमधे, आपत्कालीन सेवा आणि ‘ट्रॉमा केअर’ सुविधांची क्षमता 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यावर भर दिला. अर्थसंकल्पानंतर झालेल्या वेबिनार मध्ये, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा, औषधे, निदान सुविधा आणि गुणवत्ता, मनुष्यबळ, शैक्षणिक विस्तार आणि कौशल्ये तसेच डिजिटल निदान सेवा आणि त्यांची गुणवत्ता, आणि रुग्णालयापूर्वीच्या सेवांचे एकत्रीकरण, आशा सर्व विषयांचे अध्ययन करण्यासाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांना देण्यात आली.  

तसेच, भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार (‘आयपीएचएस) जिल्हा रुग्णालयांमधील उपलब्ध सुविधा आणि आवश्यक सुविधांमधील तफावतीचे सर्वंकष विश्लेषणही पूर्ण करण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले.

मंत्र्यांनी ‘अलाइड हेल्थ प्रोफेशनल्स’  (एएचपी) परिसंस्था बळकट करण्यासाठीच्या अर्थसंकल्पीय उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पुढील पाच वर्षांत निवडक 10 शाखांमध्ये 1 लाख एएचपीची भर घालणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याबाबत उद्योग, राज्य सरकारे, केंद्र आणि राज्य सरकारी संस्था आणि रुग्णालये, अंमलबजावणी करणाऱ्या संस्था तसेच नियामक संस्था यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्र्यांना देण्यात आली. व्यय वित्त समितीच्या (ईएफसी) टिपणीचा एक मसुदा तयार करून संबंधित मंत्रालये आणि नीती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

   

याप्रसंगी मंत्री  नड्डा यांनी येत्या वर्षात 1.5 लाख बहुकुशल सेवा दक्षता प्रदात्यांना ‘एनएसक्यूएफ’-अनुरूप प्रशिक्षण देऊन एक मजबूत काळजीवाहक परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमाच्या प्रगतीचाही आढावा घेतला.

जागतिक मानके आणि औषधांच्या मंजुरीसाठी निर्धारित कालमर्यादा पूर्ण करण्याच्या दृष्टीने समर्पित वैज्ञानिक पुनरावलोकन संवर्ग आणि तज्ञ मनुष्यबळाच्या माध्यमातून केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला (सीडीएससीओ) बळकट करण्याच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावाच्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. मनुष्यबळ रचना, पदांची संख्या, वेतनश्रेणी तसेच विविध स्तरांवरील कायमस्वरूपी आणि सक्षम मनुष्यबळाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीने आपला अहवाल सादर केला असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

   

मानसिक आरोग्यसेवा बळकट करण्याच्या उपक्रमांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला.

आरोग्य मंत्री नड्डा यांनी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीने पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे (रिजनल मेडिकल हब्स) स्थापन करण्यास राज्यांना पाठबळ देण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेतला. भारताला जागतिक वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी एक जागतिक केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304018) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English