युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्र उभारणीसाठी, खेळ हे सर्वोत्तम माध्यम - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुण्यातील 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित
Posted On:
27 AUG 2026 8:03PM by PIB Mumbai
पुणे, 27 ऑगस्ट 2026
खेळ, शारीरिक तंदुरुस्ती, तरुणांचा सहभाग आणि राष्ट्र उभारणीला चालना देण्यासाठी 'माय भारत' द्वारे पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, युवा क्रीडाप्रेमी आणि दिग्गज खेळाडू एकत्र आले होते.
या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवकांशी साधलेला संवाद. पंतप्रधानांनी युवा सहभागींशी संवाद साधला आणि 'विकसित भारत'च्या उभारणीत योगदानासाठी उत्साही, तंदुरुस्त आणि सक्षम युवाशक्तीबाबत आपला दृष्टीकोन त्यांच्यासमोर मांडला.

या कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, प्रसिद्ध खेळाडू हिना सिंधू, शर्वरी शेंडे आणि ऋतुजा भोसले सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
उपस्थितांनासंबोधित करताना, मुरलीधर मोहोळ यांनी तंदुरुस्त, शिस्तप्रिय,आत्मविश्वासपूर्ण युवा पिढी घडवण्यात खेळांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास आणि जिद्द व चिकाटीने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. राष्ट्र उभारणीसाठी खेळ हे सर्वोत्तम माध्यम आहे, असे ते म्हणाले.
उपस्थित मान्यवर खेळाडूंनी त्यांच्या क्रीडा प्रवासातील प्रेरणादायी अनुभव सांगितले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. क्रीडा क्षेत्रात आणि आयुष्यात यश संपादन करण्यासाठी शिस्त, दृढनिश्चय, सांघिक भावना, चिकाटी आणि आव्हानांवर मात करणे महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.
_20260827180823_c6dfec.jpeg)
पंतप्रधानांच्या आभासी संवादामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय नेतृत्वाशी जोडले जाण्याची एक प्रेरणादायी संधी मिळाली आणि व्यक्तिमत्व, नेतृत्व, शिस्त व निरोगी जीवनशैली विकसित करण्यात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात, हा संदेश अधिक दृढ झाला.
'नशा मुक्ती' शपथेने कार्यक्रमाची सांगता
'नशा मुक्ती' शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली, ज्यामध्ये विद्यार्थी आणि सहभागींनी एकत्रितपणे अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहण्याची आणि इतरांना निरोगी व जबाबदार जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली.
या शपथेने, निरोगी, सशक्त आणि विकसित भारतासाठी व्यसनमुक्त तरुण पिढी आवश्यक आहे, या संदेशाला बळ मिळाले. हा उपक्रम तरुणांमध्ये तंदुरुस्ती, खेळ आणि सकारात्मक सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक उद्दिष्टांनाही पूरक ठरला.
विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे 'खेलो इंडिया संवाद' हा एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरला, आणि तरुणांना सक्षम करण्याच्या आणि राष्ट्र उभारणीत सकारात्मक योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या 'माय भारत'च्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.


* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303937)
अभ्यागत कक्ष : 27