संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जबलपूर येथील वाहन कारखान्यामध्ये टी-सीरीज' रणगाड्यांच्या ओव्हरहॉल प्रकल्पाचे भूमिपूजन


472 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दरवर्षी 80 रणगाड्यांच्या दुरुस्तीची सोय; भारतीय लष्कराची परिचालन सज्जता वाढण्यासोबतच रोजगाराच्या संधीही निर्माण होणार

Posted On: 27 AUG 2026 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 27,ऑगस्ट 2026 रोजी जबलपुर येथील वाहन कारखान्यामध्ये 'टी-सीरीज' रणगाड्यांच्या नूतनीकरण/दुरुस्ती  प्रकल्पाचे भूमिपूजन केले. ही फॅक्टरी 'मिनी रत्न' दर्जा असलेल्या 'आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड' (AVNL) या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाचा एक भाग आहे.

या प्रकल्पात T-72 आणि T-90 रणगाड्यांच्या दुरुस्तीसाठी सुविधा उभारण्याचा समावेश आहे. यासाठी  472 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून  हा प्रकल्प देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

भारतीय सैन्याला नूतनीकरण केलेले रणगाडे वेळेवर उपलब्ध करून देऊन त्यांची परिचालन सज्जता  वाढवण्याच्या उद्देशाने, जबलपूर येथील कारखान्यामध्ये दरवर्षी 80  रणगाड्यांची दुरुस्ती  करण्याची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सैन्याला दरवर्षी 230 रणगाड्यांच्या दुरुस्ती देखभालीची आवश्यकता असते आणि आवडी  येथील 'हेवी व्हेईकल्स फॅक्टरी'ची सध्याची देखभाल दुरुस्ती क्षमता दरवर्षी 150 रणगाड्यांची आहे.

आपल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी या प्रकल्पाचे वर्णन भारताच्या वाढत्या तंत्रज्ञान सामर्थ्याचे आणि औद्योगिक क्षमतांचा दाखला असे  केले; तसेच, आगामी काळात जगातील प्रमुख संरक्षण-सामग्री उत्पादन आणि निर्यात केंद्रांपैकी एक म्हणून उदयाला येण्याच्या भारताच्या उद्दिष्टात या प्रकल्पाचे महत्वपूर्ण योगदान असेल  असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

"आधुनिक युद्ध पद्धतीमध्ये केवळ एकाच प्रणालीवर अवलंबून राहण्याऐवजी एकत्रित क्षमतांची आवश्यकता असते. आधुनिक युद्धभूमीच्या गरजांनुसार आपल्या रणगाड्यांना प्रगत सेन्सर्स आणि क्षमतांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज  आहे. सैनिकांना ड्रोन, क्षेपणास्त्रे, तोफखाना, इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमता, ऊर्जा-आधारित शस्त्रे आणि अद्ययावत रणगाडे उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्यात उत्तम समन्वय सुनिश्चित करणे यावर आमचा भर आहे. ही नूतनीकरण व दुरुस्ती सुविधा या उद्दिष्टाला चालना देण्यास मदत करेल," असे  राजनाथ सिंह म्हणाले.

   

"संरक्षण सामग्रीचे देशांतर्गत उत्पादन करणे, देशातच दुरुस्ती व देखभालीची कामे करणे, आधुनिक तंत्रज्ञानासह विद्यमान प्रणाली अद्ययावत करणे आणि स्वदेशी बनावटीची पुढच्या पिढीतील क्षमता विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे," असे ते म्हणाले.

टी-सीरीज  रणगाड्यांच्या दुरुस्ती सुविधांमुळे विविध प्रकारचे यांत्रिक, विद्युत, इलेक्ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक घटक, असेंब्लीज व उप-प्रणालींची  मागणी वाढेल आणि परिणामी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी  मोठ्या संधी निर्माण होतील. या वस्तूंच्या खरेदीमुळे  मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल, तसेच रणगाड्यांच्या दुरुस्तीशी संबंधित उत्पादन आणि पूरक सेवांच्या क्षेत्रात स्थानिक एमएसएमईसाठी अधिक संधी निर्माण होतील.  यामुळे स्थानिक उद्योगांचा सहभाग वाढण्यास चालना मिळेल आणि एक मजबूत व स्वावलंबी औद्योगिक परिसंस्था विकसित होण्यास मदत होईल.  राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, हा प्रकल्प सैनिकांसाठी वरदान ठरेल तसेच  जबलपूर व आसपासच्या भागातील शेतकरी, कामगार, युवक  आणि छोटे उद्योजक यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303932) अभ्यागत कक्ष : 8