नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'भारत रिन्यूएबल एनर्जी समिट 2026 च्या निमित्ताने केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचा मुंबईत रोडशो; स्वच्छ ऊर्जेतील गुंतवणूक वाढवण्याचे हितधारकांना केले आवाहन


हरित-ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध: प्रल्हाद जोशी

महाराष्ट्र सरकार या परिषदेत'भागीदार राज्य' म्हणून सहभागी होणार: महाराष्ट्र सरकारचे मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांची माहिती

'भारत रिन्यूएबल एनर्जी समिट अँड एक्स्पो 2026' चे 2 ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे आयोजन

Posted On: 27 AUG 2026 6:20PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, शिक्षण, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज मुंबईत आगामी  'भारत रिन्यूएबल एनर्जी समिट अँड एक्स्पो (BRESE) 2026' च्या निमित्ताने आयोजित रोड शोमध्ये गुंतवणूकदार, विकासक, वित्तीय संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संबंधितांच्या एका उच्च-स्तरीय बैठकीला संबोधित केले.

याप्रसंगी बीजभाषणात केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ऊर्जा क्षेत्रातील सर्व संबंधितांना आगामी 'BRESE 2026' मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आणि या परिषदेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उत्सुकता निर्माण झाली असल्याचे नमूद केले. 'BRESE 2026' च्या निमित्ताने तीन प्रमुख जागतिक मंच — 'BRE समिट आणि एक्स्पो', 'इंटरनॅशनल सोलर अलायन्सची (आंतरराष्ट्रीय सौर आघाडी) 9 वी सर्वसाधारण सभा' आणि 'हरित हायड्रोजनवरील चौथी आंतरराष्ट्रीय परिषद' एकाच छताखाली एकत्र येणार आहेत. या चार दिवसीय कार्यक्रमात 75 हून अधिक देशांचे प्रमुख आणि ऊर्जा मंत्री, जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदार, तंत्रज्ञान पुरवठादार तसेच नवीकरणीय ऊर्जा मूल्य साखळीतील 25,000 हून अधिक सहभागी एकत्र येतील, अशी अपेक्षा असल्याचे  जोशी यांनी सांगितले.

जोशी म्हणाले की, ही परिषद उद्योगातील भागधारकांना भागीदारी निर्माण करण्याची, नवीन बाजारपेठा शोधण्याची आणि जागतिक गुंतवणूकदार व तंत्रज्ञान पुरवठादारांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देईल. राज्यांसाठी ही परिषद जागतिक विकासक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांसमोर त्यांचे प्रस्तावित प्रकल्प   सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल ; तसेच बँका आणि गुंतवणूकदारांसाठी प्रकल्प व वित्तपुरवठ्याच्या संधी यांच्यात अधिक समन्वय साधणे यामुळे शक्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील वाढ अधोरेखित करत प्रल्हाद जोशी म्हणाले की, भारताने बिगर -जीवाश्म स्रोतांपासून स्थापित  उर्जेची 300 गिगावॉटची क्षमता ओलांडली आहे आणि सुमारे 302 ते 303 गिगावॉटपर्यंत पोहोचवली आहे, तर 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' सुमारे 53.5 लाख लाभार्थी कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे. जोशी यांनी नमूद केले  की, गेल्या 12 वर्षांत भारताची बिगर -जीवाश्म स्रोतांपासूनची ऊर्जा क्षमता 80.3  गिगावॉटवरून 300.5 गिगावॉटपर्यंत वाढली असून, यात 275 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

याच कालावधीत, सौर ऊर्जा क्षमता, 2.8 गिगावॉट वरुन 165 गिगावॉट पर्यंत वाढली असून, त्यात तब्बल 58 पट वृद्धी झाल्याचे दिसते आहे, तर पवनऊर्जा क्षमता, 21 गिगावॉट वरुन 58 गिगावॉट पर्यंत वाढली असून, त्यात 176 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. आर्थिक वर्ष 2026–27 च्या पहिल्या चार महिन्यात, भारताने, 17 गिगावॉट इतक्या अक्षय ऊर्जा क्षमतेची वाढ साध्य केली आहे, असेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. यात, 14.33 गिगावॉट सौर ऊर्जा आणि 2 गिगावॉट पेक्षा अधिक पवन ऊर्जेचा समावेश आहे.

भारत, जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी  अर्थव्यवस्था असून, देशात आज देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणुक आकर्षित होत  आहे. देशभरात वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत असताना, हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष 2030 पर्यंत 500 गिगावॉट बिगर-जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा क्षमता साध्य करण्यासाठी पुढील पाच वर्षांत 30 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे, अशी माहिती, जोशी यांनी दिली.  या भांडवलाचा मोठा भाग, भारतीय वित्तीय संस्था, भांडवली बाजार, विमा निधी, पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि खासगी भांडवलाच्या माध्यमातून उभारावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच, भारताच्या स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक व्यवस्थेसाठी, मुंबई हे एक महत्त्वाचे केंद्र ठरते, असेही जोशी यांनी नमूद केले.

महाराष्ट्राने BRESE 2026 चा संपूर्ण लाभ घ्यावा असे आवाहन करत, राज्याने आपल्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे आणि यशस्वी मॉडेल्सचे सादरीकरण करण्याची सूचना केली. विशेषतः पीएम-कुसुम योजनेअंतर्गत राज्याने मिळवलेल्या अनुभवाचा प्रभावीपणे उपयोग करून, कृषी क्षेत्रातील यशस्वी सौरऊर्जा मॉडेल्सचा इतरत्र वापर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

BRESE 2026 मध्ये, महाराष्ट्र सरकार, भागीदार राज्य म्हणून, सहभागी असेल, असे महाराष्ट्र  राज्याचे अक्षय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले. पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेअंतर्गत, सौर विजेचे जाळे देण्याच्या बाबतीतही महाराष्ट्र देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आहे, असेही सावे यांनी सांगितले. राज्यात छतावरील सौरऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम पायाभूत व्यवस्था आधीपासूनच उपलब्ध आहे, तसेच, राज्याने सर्वाधिक सौरपंप बसविण्याचे उद्दिष्टही पूर्ण केले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

BRESE 2026 हे अक्षय ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हाने आणि उपलब्ध संधींवर चर्चा करण्यासाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी व्यक्त केला. तसेच या विभागाचे सहसचिव जेव्हीएन सुब्रमण्यम यांनी BRESE 2026  च्या माध्यमातून अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विविध भागधारकांना उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती दिली.

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) सहकार्याने  2 ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या बीआरई शिखर परिषद 2026 च्या पार्श्वभूमीवर  या  रोड शोचे आयोजन करण्‍यात आले. देशव्यापी प्रादेशिक कार्यक्रमांच्या मालिकेतील हा  दुसरा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी तसेच भारतातील नवीकरणीय ऊर्जा, बँकिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांतील प्रमुख प्रतिनिधी सहभागी झाले.

मुंबईतील रोडशोने भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमांची तळागाळापर्यंत वाढती व्याप्ती देखील अधोरेखित केली. फेब्रुवारी 2024 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून 28,000 कोटी रुपयांहून अधिक केंद्रीय आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे, ज्यामुळे आता देशभरातील 50 लाखांहून अधिक कुटुंबे 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' अंतर्गत स्वतःची सौर ऊर्जा निर्माण करत आहेत. योजनेचा निधी 2025-26 मधील 17,000 कोटी रुपयांवरून 2026-27 मध्ये 22,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यावरुन या योजनेचा वाढता विस्तार आणि वेग दिसून येतो. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत, लाखो शेतकऱ्यांनी डिझेलवर अवलंबून असलेल्या सिंचन प्रणालीऐवजी सौर पंपांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी केवळ ऊर्जा वापरणारे न राहता उर्जा क्षेत्रात पूर्णपणे कार्यरत झाले आहेत.

याआधी जयपूर येथे 24 ऑगस्ट 2026 रोजी  झालेल्या यशस्वी उद्घाटन रोडशोच्या पाठोपाठ मुंबईतील हा कार्यक्रम  होत आहे. येत्या काही आठवड्यांत हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, बंगळूर आणि कोलकाता येथे पुढील रोडशो आयोजित केले जाणार आहेत. एमएनआरई आणि आयोजनातील भागीदारांनी सर्व राज्य सरकारे, वीज कंपन्या आणि उद्योग क्षेत्रातील हितधारकांना या प्रादेशिक सत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

 

भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन (बीआरई शिखर परिषद) 2026 

भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन (बीआरई शिखर परिषद) 2026 हे जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा प्रदर्शनांपैकी एक असून, स्वच्छ ऊर्जा सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला भेट द्या: www.bresummit.in.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


(Release ID: 2303872) अभ्यागत कक्ष : 25