पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमात झाले सहभागी
'खेलो इंडिया' हे देशभरातील क्रीडा-प्रतिभा जोपासणारे एक उत्कृष्ट व्यासपीठ बनले आहे; ते युवा खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक संधी आणि पाठिंबा देत आहे: पंतप्रधान
जेव्हा मी खेळांबद्दल बोलतो, तेव्हा ते केवळ पदके जिंकण्यापुरते सीमित नसते; 'विकसित भारत' घडवण्यासाठी भारताची क्रीडा-शक्ती आणि युवकांची ऊर्जा यांची सांगड घालण्याची ही एक मोहीम आहे: पंतप्रधान
असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही, मात्र इतर देश त्यात पदके जिंकत आहेत; आपण त्या खेळांमध्येही नैपुण्य मिळवायला हवे: पंतप्रधान
खेळ आपल्याला केवळ विजेते होणे शिकवत नाही, तर उत्तम स्पर्धक बनायला देखील शिकवतात; तसेच पराभूत झाल्यानंतर पुन्हा नेटाने उभे रहायला देखील शिकवतात: पंतप्रधान
स्क्रीनपेक्षा क्रीडा केंद्रे अधिक महत्त्वाची आहेत; प्लेस्टेशन्स पेक्षा खेळांची मैदाने अधिक महत्त्वाची आहेत : पंतप्रधान
Posted On:
27 AUG 2026 4:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमात सहभागी झाले. इतक्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयोजक, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री आणि 'माय भारत' चे लाखो स्वयंसेवक यांचे मनापासून अभिनंदन केले. 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा दिना'चा उल्लेख करत त्यांनी देशभरातील युवकांना आणि क्रीडा क्षेत्रातील सर्वांना आधीच शुभेच्छा दिल्या. "हा दिवस भारत मातेचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद जी यांचे स्मरण करण्याचाही दिवस आहे," असे मोदी यांनी नमूद केले.
भारतीय सैन्याच्या हॉकी संघाने शंभर वर्षांपूर्वी केलेल्या ऐतिहासिक न्यूझीलंड दौऱ्याची आठवण करून देत, पंतप्रधानांनी उभय देशांमधील क्रीडा संबंध प्रस्थापित करण्यात मेजर ध्यानचंद यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडला दिलेल्या आपल्या भेटीचा आणि तिथे या महान खेळाडूच्या स्मृतीला दिलेला उजाळा यांचा उल्लेख करत, त्यांनी हे ऐतिहासिक संबंध अधिक समृद्ध करण्याप्रति देशाच्या निरंतर कटिबद्धतेवर भर दिला. "मेजर ध्यानचंद जी यांनी ज्या संबंधांचा पाया रचला, ते संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत आज सातत्याने काम करत आहे," असे मोदी म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून क्रीडाविषयक दृष्टिकोन मांडल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की खेळांचे महत्त्व केवळ पदके जिंकण्यापुरते मर्यादित नाही. तर 'विकसित भारत' घडवण्याच्या दिशेने देशातील क्रीडा आणि युवा शक्तीला एकमेकांशी जोडणारी एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे. "मी नेहमीच म्हणत आलो आहे, जे खेळतात, तेच बहरतात" असे मोदी यांनी नमूद केले.
क्रीडा क्षेत्रातल्या यशाची व्यापक व्याख्या करत, पंतप्रधानांनी सांगितलं की, अॅथलेटीक्सना खेळात मिळणारे यश, त्यांचे व्यक्तिमत्व घडवत असते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, कुटुंबाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो आणि ते देशाचाही गौरव वाढवत असतात. एका खेळाडूला मिळालेले यश, त्याची शाळा, जिल्हा आणि राज्य या सगळ्यांचा गौरव वाढवत असते. त्याच्या प्रदेशाला जागतिक नकाशावर ओळख मिळवून देत असतात. "प्रत्येक जिल्ह्यात, जागतिक क्रीडाक्षेत्राच्या नकाशावर स्वतःचे स्थान निर्माण करण्याची क्षमता आहे. ही क्षमता समजून घेऊनच, आपल्याला हा संवाद कार्यक्रम पुढे न्यायचा आहे," असे मोदी यांनी सांगितले.
आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, त्यांनी ज्या आव्हानावर भर दिला होता, त्याकडेही पंतप्रधानांनी आजच्या भाषणात लक्ष वेधले. त्या भाषणात, पंतप्रधानांनी, ऑलिंपिकमधल्या जवळपास अर्ध्या खेळांमध्ये भारताचे संघ सहभागीच होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 2012 च्या ऑलिंपिक स्पर्धेत, भारताने केवळ 13 क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता, असे सांगत 20 पेक्षा अधिक जागतिक क्रीडाप्रकारांकडे दुर्लक्ष करून, भारत, पदकतालिकेतल्या एका मोठ्या भागावर पाणी सोडत आहे, ते थांबवलं पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले." पदकतालिकेत आपले स्थान उंचावायचे असेल, तर आपल्याला या सगळ्या खेळातही प्रावीण्य मिळवावेच लागेल, यावर त्यांनी भर दिला.
भारतात आजही अनेक छुप्या क्रीडा प्रतिभा आहेत, असा उल्लेख करत, भारताकडे सर्फिंग, स्पोर्ट्स क्लाइंबिंग आणि हिवाळी क्रीडांसाठी अनुकूल अशी विस्तीर्ण किनारपट्टी तसेच पर्वतीय प्रदेश असूनही, या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची जागतिक स्तरावर अद्याप म्हणावी तशी ओळख निर्माण झालेली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. देशभरातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विशेष क्रीडा प्रतिभा आणि व्यवस्था शोधून त्यांचा विकास करण्यासाठी त्या त्या क्षेत्रांवर भर देण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
2036 च्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी एका दीर्घकालीन धोरणाची रूपरेषा स्पष्ट करत, पंतप्रधानांनी, विविध क्रीडाप्रकारांमध्ये, पात्र होऊ शकतील, अशा क्षमतेच्या खेळाडूंना ओळखून, त्यांची तातडीने पूर्ण तयारी करुन घेण्यावर त्यांनी भर दिला. पाच ते 15 वर्षे वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध मोहीम सुरू करण्याचा पुनरुच्चार करत त्यांनी सांगितले की, निवड प्रक्रियेत संबंधित क्रीडा प्रकारातील मुलांची आवड तसेच त्यांची विशिष्ट शारीरिक तंदुरुस्ती या दोन्ही बाबींना प्राधान्य दिले पाहिजे. “यासाठी सरकारकडून ज्या कोणत्या मदतीची आवश्यकता असेल, त्यासाठी सरकार तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत उभे राहील,” अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
एकविसाव्या शतकातील आधुनिक अशी क्रीडा व्यवस्था उभारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी विशेष क्रीडा विद्यापीठे आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांची सुरू असलेली स्थापना याबाबत सविस्तर माहिती दिली. क्रीडा विज्ञान, प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी, सरकार आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचे सक्रिय प्रयत्न करत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. "देशात एक अशी प्रणाली तयार केली जात आहे, ज्याद्वारे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहचवण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर पाठबळ दिले जाईल," असे म्हणाले.
क्रीडा विकासाबाबत सरकारचे गांभीर्य अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी 'खेलो इंडिया संवाद' म्हणजे केवळ एक चर्चा नसून देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला सक्रियपणे आकार देणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे सांगितले. तरुणांनी त्यांच्या वैयक्तिक आकांक्षांना राष्ट्रीय स्वप्नांशी जोडण्यासाठी या संवादाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रतिभा विकास आणि क्रीडा प्रशासनावरील तरुणांनी दिलेल्या अभिप्रायाचा धोरणनिर्मितीवर थेट प्रभाव दिसेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. "युवाशक्तीच्या याच नव्या कल्पना 'विकसित भारत’ साकारण्यात मोठी शक्ती बनतील," असे पंतप्रधानांनी सांगितले.
निरोगी समाज, मजबूत कुटुंब व्यवस्था आणि उत्कृष्ट कार्यसंस्कृती जोपासण्यासाठी खरी खिलाडूवृत्ती आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्राचे समाजाला होणारे फायदे अधोरेखित करताना नमूद केले. क्रीडा क्षेत्र व्यक्तींना केवळ विजेते कसे बनायचे हेच नाही, तर अपयशांना धैर्याने सामोरे जाऊन पुन्हा कसे उभे राहायचे हे देखील शिकवते. "क्रीडा आपल्याला केवळ विजेते बनायलाच शिकवत नाही, तर आपल्याला अधिक चांगले स्पर्धक बनायलाही शिकवते" असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
खेळाच्या अविश्वसनीय परिवर्तनकारी शक्तीची प्रशंसा करताना, पंतप्रधानांनी देशातील पॅरा ॲथलीट्सचा विशेष उल्लेख केला. जीवन आणि प्रतिकूल परिस्थितीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यात आहे, असे ते म्हणाले. एका दिव्यांग खेळाडूचे यश त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नवचैतन्य देते. त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षात त्यांना साथ देणाऱ्या आई-वडिलांचे आणि भावंडांचे धैर्य आणि स्वप्नेही या यशाने उंचावतात, असे ते म्हणाले.
पॅरा ॲथलीट्सच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल वैयक्तिक प्रेरणा व्यक्त करताना, पंतप्रधानांनी तिरंदाज शीतल, दोन पॅरालिम्पिक पदक विजेती अवनी लेखरा, सुमित अंतिल, नितेश कुमार आणि झंडू कुमार यांसारख्या पॅरा ॲथलीट्सच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. त्यांच्या विजयामुळे त्यांच्या राज्यांना आणि संपूर्ण देशाला प्रचंड अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. "जेव्हा मी अवनीला भेटतो, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो; असा प्रत्येक सहकारी आम्हाला प्रेरणा देतो," असे पंतप्रधान म्हणाले.
उत्तम जीवनमानासाठी खेळ ही एक मूलभूत गरज असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आयुष्यभराची तंदुरुस्ती आणि खेळाप्रती असलेल्या उत्कटतेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून वयाची शंभरी पार करणारे महान खेळाडू फौजा सिंग यांचा उल्लेख केला. त्यांनी यावर भर दिला की, फौजा सिंग यांचे आयुष्य शारीरिक सक्रियता आणि सर्वांगीण आरोग्य यांच्यातील सखोल संबंधाचे एक उत्तम उदाहरण आहे. "क्रीडाक्षेत्र आणि जीवनमान यांचा एकमेकांशी कसा घनिष्ठ संबंध आहे, याची एक मोठी प्रेरणा म्हणजे त्यांचे आयुष्य," असे मोदी यांनी नमूद केले.
अंमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेच्या गंभीर सामाजिक आव्हानाकडे देखील पंतप्रधानांनी यावेळी लक्ष वेधले. खेळात मनापासून सहभागी झाल्याने व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल आपोआप निर्माण होते, असे सांगत त्यांनी, तरुणांमधील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी क्रीडाक्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. "आज जेव्हा तरुणांसमोर व्यसनाधीनतेचे मोठे आव्हान उभे आहे, तेव्हा त्यावर मात करण्यासाठी क्रीडाक्षेत्रही यात अत्यंत अर्थपूर्ण योगदान देत आहे," असा ठाम विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
भारतात क्रीडा क्षेत्राकडे आता एक अत्यंत प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे, या बदलाचा आनंद व्यक्त करताना पंतप्रधानांनी एका नव्या सांस्कृतिक परिवर्तनाचा उल्लेख केला. नागरिक आता ट्रायथलॉन, 5 किमी व 10 किमी धावण्याच्या शर्यती आणि 'हायरॉक्स' सारख्या फिटनेस आव्हानांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शीर्षासन करण्यापासून ते अगदी सहजपणे पिकलबॉल खेळण्यापर्यंत, खेळांनी शिक्षण आणि करिअरच्या बरोबरीने दैनंदिन जीवनशैलीत आपले स्थान यशस्वीपणे निर्माण केले आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. "हाच तो बदल आहे, हेच ते परिवर्तन आहे, ज्यामुळे भारताच्या क्रीडा क्षेत्रातील भविष्यावरील विश्वास उत्तरोत्तर वाढत आहे," असे मोदी म्हणाले.
खेळांमध्ये तळागाळापासून सहभाग वाढवण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. जेव्हा शाळा शारीरिक शिक्षणाला केवळ एक सह-अभ्यासक्रम उपक्रम न मानता आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्राधान्य देतील, तेव्हाच खऱ्या क्रीडा संस्कृतीची निर्मिती होईल, असे ते म्हणाले. खेळांना संस्थात्मक स्वरूप दिल्याने राष्ट्रीय स्तरावर क्रीडा गुणवत्तेचा पाया तर विस्तारतोच, पण त्याचसोबत उगवत्या खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाचा मोलाचा पाठिंबा मिळणेही सुनिश्चित होते, असे त्यांनी नमूद केले. "स्क्रीनपेक्षा स्पोर्ट्स सेंटर्स अधिक महत्त्वाचे आहेत. प्लेस्टेशनपेक्षा खेळाची मैदाने जास्त महत्त्वाची आहेत," असे मोदी यांनी निक्षून सांगितले.
खेळाचे मैदान असो वा समाज, तरुणांचा सक्रिय सहभाग हीच राष्ट्राची खरी ताकद असल्याचे सांगत पंतप्रधानांनी, भारतातील युवा पिढीच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. क्रीडा उपकरणांचे आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या क्षेत्रांमुळे क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधींचा प्रचंड विस्तार झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "तुम्ही या संधी हातच्या गमावता कामा नयेत; म्हणूनच, या संवादादरम्यान तुमचे विचार-कल्पना अगदी मोकळेपणाने मांडा," असे आवाहन मोदी यांनी केले.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303759)
अभ्यागत कक्ष : 12