ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
कांद्याची पुरेशी उपलब्धता, सणासुदीच्या काळातील संभाव्य दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त राखीव साठ्यातील कांदा नियोजनबद्ध आणि गरजेनुसार उपलब्ध करून देणार
पहिली कांदा एक्सप्रेस नाशिकहून नवी दिल्लीसाठी रवाना
भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ, राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ, केंद्रीय भंडार आणि इतर किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून 35 रुपये प्रति किलो दराने होणार कांद्याची विक्री
एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय भंडार आणि इतर किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून 35 रुपये प्रति किलो दराने कांद्याची करणार विक्री
Posted On:
26 AUG 2026 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
येत्या काही महिन्यांतील कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या तसेच सणासुदीच्या काळातील संभाव्य दरवाढ रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आपल्या अतिरिक्त राखीव साठ्यामधील (बफर स्टॉक) कांदा नियोजनबद्ध आणि गरजेनुसार उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली आहे. याअंतर्गत कांद्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे मालवाहतूक गाड्या आणि रस्ते वाहतूक या दोन्हीं माध्यमांचा संमीश्रपणे वापर केला जात आहे. बाजारातील सद्यस्थिती आणि किमतींचे कल लक्षात घेऊनच खरेदी विक्रीच्या मुख्य केंद्रांना कांद्याचा पुरवठा केला जात आहे.
कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि मुबलक उत्पादन
येत्या काही महिन्यांतील देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने देशात कांद्याची समाधानकारक उपलब्धता आहे. यासोबतच 2025 - 26 मध्ये कांद्याचे उत्पादन 307.37 लाख मेट्रिक टन असेल असा अंदाज आहे. तुलनात्मक पातळीवर उत्पादनाचा हा अंदाज जवळपास मागील वर्षातील 307.67 लाख मेट्रिक टन उत्पादनाइतकाच आहे. मुबलक उत्पादन, अतिरिक्त राखीव साठ्याची उपलब्धता आणि सरकारने योग्य वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही महिन्यांतील कांद्याचा पुरवठा पुरेसा राहील आणि सणासुदीच्या काळातील दरवाढ नियंत्रणात राहण्यातही मदत होणार आहे.
उत्पादनाचा अंदाज समाधानकारक असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त राखीव साठा करण्याकरता सरकारने मूल्य स्थिरीकरण निधीअंतर्गत 2026-27 या वर्षात 2.00 लाख मेट्रिक टन रब्बी कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. 15 मे 2026 पासून भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघाच्या (नाफेड) माध्यमातून ही खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत अतिरिक्त राखीव साठ्यासाठी सुमारे 1.21 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे.
साठवणूक व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी, 2026-27 या वर्षात मूल्य स्थिरीकरण निधीअंतर्गत खरेदी केलेल्या कांद्याच्या साठ्यासाठी, पहिल्यांदाच केंद्रीय वखार महामंडळाची साठवणूक यंत्रणा म्हणून मदत घेण्यात आली आहे. ओणम, गणेशोत्सव, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईचा काळ यांसारख्या सणासुदीच्या दिवसांमधली वाढती मागणी आणि पुरवठा साखळीतील काही घटकांमुळे कांद्याच्या दरात सामान्यतः वाढ होत असते.
अतिरिक्त राखीव साठ्यातील कांद्याची नियोजनबद्ध आणि गरजेनुसार विक्री
कांद्याची पुरेशी उपलब्धता कायम राहावी आणि अवाजवी दरवाढ रोखली जावी यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त राखीव साठ्यामधील कांदा नियोजनबद्ध आणि गरजेनुसार उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. कांद्याची ही विक्री रेल्वे मालवाहतूक गाड्या आणि रस्ते वाहतूक या दोन्ही माध्यमांच्या वापराने केली जाणार असून, यामुळे खरेदी विक्रीच्या मुख्य केंद्रांपर्यंत कांदा सुलभतेने पोहोचवता येणार आहे. बाजारातील सद्यस्थिती आणि किमतींचे कल लक्षात घेऊन कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण, व्याप्ती आणि माध्यमांचा अधिक विस्तार केला जाणार आहे.
कांदा 35 रुपये प्रति किलो दराने विकला जाणार
एनसीसीएफ आणि नाफेडची किरकोळ विक्री केंद्रे व फिरती वाहने, तसेच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमार्फत 35 रुपये प्रति किलो दराने कांद्याची किरकोळ विक्री सुरू केली जाणार आहे. ही विक्री खालील माध्यमांतून केली जाईल:
- एनसीसीएफ : 9 विक्री केंद्रे आणि 40 फिरती वाहने
- नाफेड : 13 विक्री केंद्रे आणि 50 फिरती वाहने
- केंद्रीय भंडार: सुमारे 100 विक्री केंद्रे
ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देणे हा या किरकोळ विक्री उपक्रमाचा उद्देश आहे.
उत्पादन क्षेत्रांतून कांद्याच्या विक्री-केंद्रांपर्यंत राखीव साठ्यातील कांदे पोहोचवण्यासाठी कांदा एक्सप्रेस हा उपक्रम एक प्रभावी दळणवळण उपाय ठरला आहे. 2024-25 या काळात, 14 रेल्वे गाड्यांद्वारे सुमारे 12,000 एमटी कांदा पाच शहरांपर्यंत पोहोचवण्यात आला. 2025-26 या मध्ये मोठी वाढ झाली; यावेळी 86 रेल्वे गाड्यांद्वारे देशातील 16 शहरांपर्यंत सुमारे 88,000 एमटी कांद्याची वाहतूक करण्यात आली.
चालू आर्थिक वर्षात, नाशिक ते नवी दिल्ली दरम्यान कांदा एक्सप्रेसद्वारे कांद्याची वाहतूक सुरू झाली आहे. पहिली कांदा एक्सप्रेस नाशिकहून रवाना झाली असून ती दिल्ली-एनसीआर भागात पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनौ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर यांसारख्या इतर प्रमुख खप-केंद्रांपर्यंत रस्ते मार्गानेही कांद्याचा पुरवठा केला जात आहे. वाहतुकीचे हे हायब्रिड मॉडेल बाजारातील तत्कालीन गरजांनुसार बफर साठ्यातील कांदा विक्री-केंद्रांपर्यंत वेळेवर पोहोचवण्यास मदत करेल.

* * *
सुवर्णा बेडेकर/निलिमा चितळे/तुषार पवार/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303606)
अभ्यागत कक्ष : 12