वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी टोकियो येथे सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत भारत-जपान उद्योग गोलमेज परिषदेचे भूषविले अध्यक्षपद


जपानच्या अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री आणि पीयूष गोयल यांची द्विपक्षीय बैठक; ‘सीईपीए’च्या आढाव्याची प्रक्रिया गतिमान करण्याविषयी उभय मंत्र्यांचे एकमत

Posted On: 25 AUG 2026 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज टोकियो येथे सेमीकंडक्टर्स आणि एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर जपान आणि भारतातील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसोबत आयोजित गोलमेज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. भारत-जपान यांच्यातील आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यामध्ये या उदयोन्मुख क्षेत्रांचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या परिषदेत गोयल यांनी नमूद केले की, सेमीकंडक्टर्स आणि एआय ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे म्हणून उदयास येत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान सानाई ताकाइची यांच्या दरम्यानच्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान चर्चा झाल्याप्रमाणे 'आर्थिक सुरक्षा भागीदारी'चा हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य अधिक सखोल आणि व्यापक करण्यासाठी भारत सरकार पूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही त्यांनी सहभागी उद्योग प्रतिनिधींना दिली.

मंत्र्यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्रातील वेगाने विस्तारणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला; 2032 पर्यंत देशांतर्गत सेमीकंडक्टरची मागणी 150 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. त्यांनी सरकारच्या सर्वसमावेशक सेमीकंडक्टर धोरणाची रूपरेषा मांडली. यामध्ये चिप डिझाइन, सेमीकंडक्टर यंत्रसामग्री आणि साहित्य, फॅब्रिकेशन म्हणजे प्रत्यक्ष जोडणी - उत्पादन, एटीएमपी /ओएसएटी, संशोधन आणि विकास तसेच कौशल्य विकास यांचा समावेश आहे.

या गोलमेज परिषदेत टोकियो इलेक्ट्रॉन, दायफुकु, प्रिफर्ड नेटवर्क्स, अबेजा, मिनेबिया-मित्सुमी, तनाका प्रेशियस मेटल्स टेक्नॉलॉजीज, फुजीफिल्म होल्डिंग्ज, तोरे इंडस्ट्रीज, निप्पॉन एक्सप्रेस होल्डिंग्ज, मिझुहो फायनान्शियल ग्रुप, क्योसेरा कॉर्पोरेशन, फुजी इलेक्ट्रिक, टोक, एअर वॉटर इन्क., ह्रॉम, टोमोगावा कॉर्पोरेशन, एमयूएफजी बँक लि., नेक कॉर्पोरेशन, यामाया इलेक्ट्रॉनिक्स, एएनए  ट्रेडिंग  आणि जेट्रो  यांसारख्या सुमारे 21 प्रमुख जपानी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या परिषदेत विविध भारतीय व्यापार संघटना आणि व्यावसायिक शिष्टमंडळांनीही सहभाग नोंदवला.

सहभागी जपानी कंपन्यांनी भारतातील सेमीकंडक्टर आणि एआय क्षेत्रांमधील वाढत्या संधींबद्दल विश्वास व्यक्त केला आणि 'मेक इन इंडिया', 'डिझाइन इन इंडिया' आणि  'डेव्हलप इन इंडिया' या उपक्रमाविषयी आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. तसेच, संबंधित क्षेत्रांमधील आपल्या कामकाजाची माहिती, क्षमता आणि प्रकल्प अंमलबजावणीबाबतही या कंपन्यांनी मंत्र्यांना माहिती दिली.

या परिषदेच्या आधी, टोकियो येथे मंत्री पीयूष गोयल आणि जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री महामहिम अकाझावा र्योसेई यांच्याशी द्विपक्षीय बैठक पार पडली.

 

* * *

हर्षल आकुडे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303423) अभ्यागत कक्ष : 4