आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम (SSBSK) वर राष्ट्रीय कार्यशाळा केली आयोजित

Posted On: 25 AUG 2026 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम (एसएसबीएसके) या विषयावर 24 आणि 25 ऑगस्ट 2026 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) मिशन संचालक आराधना पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी; महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी; सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील बाल आरोग्य आणि आशा कार्यक्रमासाठीचे राज्य नोडल अधिकारी; तांत्रिक तज्ञ; आणि विकास भागीदार सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत एसएसबीएसकेच्या कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वांचे राज्य, जिल्हा, आरोग्य सुविधा आणि समुदाय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषत: जन्मापासून ते तीन वर्षांपर्यंतची नवजात बालके आणि लहान मुलांसाठी आरोग्यसेवा काळजीची सातत्यपूर्ण साखळी मजबूत करण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

भारताने नवजात आणि बालमृत्यू कमी करण्यात भरीव प्रगती केली असली तरी, उर्वरित आव्हानांवर मात करण्यासाठी आरोग्यविषयक जोखीम असलेली अर्भके व बालकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक आराधना पटनायक यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. यामध्ये विशेषतः आयुष्याचे पहिले 7 दिवस, जे नवजात बालकांच्या जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, आणि मेंदूच्या सर्वोत्तम विकासासाठी पहिली 3 वर्षे, यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. प्रत्येक मुलाच्या जगण्यासाठी, वाढीसाठी आणि विकासासाठी एसएसबीएसकेच्या काळजीच्या सातत्यपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला.

  

नवजात शिशु आणि बालकांच्या आरोग्य व जीवनरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचे एनएचएम (राष्ट्रीय आरोग्य अभियान) अभियान संचालक आणि आयुक्त संजय काटकर यांनी मांडला. नवजात शिशु आणि बालके जगण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय कार्यक्रम प्राधान्यांचे रूपांतर क्षेत्रस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीत होण्यासाठी भक्कम राज्य नेतृत्व आणि कृतिशील आरोग्य यंत्रणा किती महत्त्वाची आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नवजात बालके आणि बाल आरोग्य यासंदर्भात काम करण्याबाबत आणि एसएसबीएसके अर्थात समग्र शिशु बाल आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत विकास भागीदारांनी आपले समर्थन पुन्हा एकदा व्यक्त करत आपली मते मांडली. यामध्ये डॉ. हेमांग शाह (संचालक - आरोग्य आणि पोषण, सीआयएफएफ भारत), डॉ. पुष्पा देव चौधरी (टीम लीड - आरएमएनसीएएच, जागतिक आरोग्य संघटना - भारत), नंदे पुट्टा (आरोग्य प्रमुख, युनिसेफ भारत) आदींचा समावेश होता.

उदघाटन सत्रादरम्यान एसएसबीएसके कार्यक्रम  संसाधनांचे अनावरण झाले. यात एसएसबीएसके उद्घाटन व्हिडिओ, शैशव ऐप  व्हिडिओ आणि आघाडीवरील कार्यकर्त्यांसाठी  एसएसबीएसके प्रशिक्षण व्हिडिओ यांचा समावेश होता. संवाद, अभिमुखता आणि क्षमता बांधणीला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आरोग्य, पोषण, वाढ किंवा विकासाशी संबंधित पाठपुरावा अधिक बळकट करण्याचे महत्त्व कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले. समस्या आढळलेल्या बालकांच्या पाठपुराव्यात खंड पडू नये (किंवा ते प्रक्रियेतून गळू नयेत) याची सुनिश्चिती करण्यासाठी, समुदाय आणि प्राथमिक आरोग्य सेवांच्या माध्यमातून जसे की ग्राम आरोग्य, स्वच्छता, पोषण दिवस; आयुष्मान आरोग्य मंदिर-उपकेंद्रे आणि बाल-आरोग्य सेवा पुरवणारे  इतर मंच, यांचा समावेश आहे. 

   

कार्यशाळेदरम्यानच्या विशेष तांत्रिक सत्रांमध्ये समग्र शिशु बाल आरोग्य कार्यक्रमाच्या प्रमुख घटकांचा समावेश होता. यामध्ये जोखीम ओळखणे आणि त्यानुसार विशेष काळजी, गृहभेटींचे वेळापत्रक, मातांचे प्रसूतीपश्चातले आरोग्य व मानसिक आरोग्य, अर्भक व लहान मुलांचे पोषण, वाढ व विकासाचे निरीक्षण, पोषण देखभाल व बालकांचा सुरुवातीच्या काळातील विकास, धोक्याची लक्षणे ओळखणे, संदर्भसेवा व पाठपुरावा, संयुक्त गृहभेटी, सहाय्यक पर्यवेक्षण आणि शैशव ॲपचा वापर या बाबींचा समावेश होता.

बालकांच्या संगोपनात कुटुंबाच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. सहभागीांनी प्रतिसादात्मक संगोपन, वयानुसार योग्य खेळ व संवाद, योग्य आहार देण्याच्या पद्धती तसेच आरोग्य आणि विकासासंदर्भातील समस्या लवकर ओळखणे या बाबींमध्ये आईवडील, आजी-आजोबा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या महत्त्वावर चर्चा केली. 

सर्व सहभागींसोबत गटकार्याचे आयोजन करण्यात आले. यात अंमलबजावणीतील पूर्वतयारी, कार्यान्वयनातील आव्हाने, प्रशिक्षण व क्षमता बांधणीच्या गरजा, समन्वय यंत्रणा आणि राज्यनिहाय अंमलबजावणीच्या धोरणांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. या चर्चेतून समग्र शिशु बाल आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्यांनी सक्रिय भागीदार आणि सह-उत्तरदायी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज अधोरेखित झाली.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303379) अभ्यागत कक्ष : 11