सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रीय अंतराळदिनाचे औचित्य साधून, गोवा विज्ञान केंद्रात महिनाभर अंतराळ विषयक प्रदर्शनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2026 6:42PM by PIB Mumbai
पणजी, 20 ऑगस्ट 2026
केंद्र सरकारच्या, संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील, राष्ट्रीय विज्ञान परिषद संग्रहालयाचा भाग असलेले गोवा विज्ञान केंद्र, भारतीय भौतिकशास्त्र शिक्षक संघटना आणि गोवा प्रादेशिक परिषदेच्या सहकार्याने, 21 ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करणार आहे.
“प्राचीन आकाशापासून आधुनिक क्षितिजापर्यंत” हे प्रदर्शन, या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. हे प्रदर्शन 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या काळात पणजीतील मिरामार इथल्या गोवा विज्ञान केंद्रात सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात, भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीच्या प्रवासाची झलक या प्रदर्शनात बघायला मिळेल.
या प्रदर्शनात, इस्रोची अवकाश अभियाने, उपग्रह तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील भारतातील महत्वाचे प्रकल्प, यात चांद्रयान, मंगळयान आणि गगनयान, यांचाही समावेश असेल. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे मॉडेल्स देखील या प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. यामुळे प्रदर्शन बघण्यास येणाऱ्यांना भारताच्या चंद्रविषयक संशोधन कार्यक्रमाची अधिक जवळून माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे; मात्र विज्ञान केंद्राचे नेहमीचे प्रवेश शुल्क लागू राहील.
या उत्सवांतर्गत 25 ऑगस्ट रोजी अंतराळ संशोधनावरील प्रश्नमंजुषा आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमावर लोकप्रिय विज्ञान व्याख्यानाचे आयोजनही करण्यात येणार आहे. प्रश्नमंजुषा सकाळी 10 ते दुपारी एक या वेळेत दोन टप्प्यांत घेण्यात येईल. यामध्ये लेखी प्राथमिक फेरी आणि त्यानंतर मौखिक फेरी असेल. गोव्यातील विविध शाळांमधून प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या संघांनी यात सहभागी होणे अपेक्षित आहे.
23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ केलेल्या ऐतिहासिक सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. या ऐतिहासिक कामगिरीमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
विज्ञान केंद्र आणि आयएपीटी गोवा प्रादेशिक परिषदेने विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे, प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि अंतराळ व भौतिकशास्त्राच्या अद्भुत विश्वाविषयी अधिक जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2301652)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English