विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
प्रामुख्याने कर्करोग पेशींमध्येच सक्रिय होणारे, कर्करोगावरील आधुनिक औषध विकसित; केमोथेरपीला ठरू शकते प्रभावी पर्याय
Posted On:
19 AUG 2026 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
केवळ कर्करोगाच्या पेशींमध्येच सक्रिय होऊन कार्य करणारे एक नवीन "आधुनिक" कर्करोगविरोधी औषध विकसित करण्यात आले आहे, जे पारंपरिक केमोथेरपीला पर्याय ठरू शकते. पारंपरिक केमोथेरपी अनेकदा कर्करोगाच्या पेशींसोबत निरोगी पेशींचेही नुकसान करते. कर्करोगाच्या उपचारादरम्यान अनेकदा निरोगी पेशींना इजा पोहोचते. त्यामुळे रुग्णाला तीव्र दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, शरीरातील निरोगी पेशींवर परिणाम न करता केवळ कर्करोगाच्या पेशींवरच परिणाम करणाऱ्या उपचारपद्धतींची गरज निर्माण झाली होती.
शास्त्रज्ञांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील 'इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी' चे डॉ. असिस बाला आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-गुवाहाटी' चे डॉ. के. पी. भाबक यांच्या संयुक्त संशोधनातून 'RK-251' नावाचे नवीन "आधुनिक" कर्करोग औषध विकसित केले गेले आहे. RK-251 हे औषध प्रामुख्याने कर्करोगाच्या पेशींमध्येच सक्रिय होण्यासाठी बनवलेले आहे आणि ते निरोगी पेशींना हानी पोहोचवत नाही.

(आकृती: केवळ कर्करोगाच्या पेशींमध्येच सुरू होणाऱ्या आणि कार्य करणाऱ्या नवीन "आधुनिक" कर्करोग औषधाचे काल्पनिक सादरीकरण)
कर्करोगाच्या पेशींमध्ये ‘रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिज’ (ROS) नावाचे हानिकारक रेणू मोठ्या प्रमाणात तयार होतात. RK-251 कर्करोगाच्या पेशीत पोहोचल्यावर या रेणूंमुळे औषध सक्रिय होते. त्यातून ‘NBDHEX’ हे शक्तिशाली कर्करोगविरोधी संमिश्र मुक्त होते. हे संमिश्र कर्करोगाच्या पेशींना जिवंत राहण्यास आणि उपचारांचा प्रतिकार करण्यास मदत करणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना रोखते.
प्री-क्लिनिकल (प्रयोगात्मक) अभ्यासात, RK-251 हे औषध अत्यंत आक्रमक मानल्या जाणाऱ्या ‘ट्रिपल-नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर’च्या पेशींवर प्रभावी ठरले. त्याचवेळी, निरोगी पेशींवर त्याचा अत्यल्प परिणाम दिसून आला.
झेब्राफिशच्या भ्रूणांवर (Danio rerio) केलेल्या अभ्यासात RK-251 मुळे विषारीपणाची कोणतीही स्पष्ट लक्षणे आढळली नाहीत. तसेच, ‘रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिज’ (ROS) च्या उपस्थितीत औषध सक्रिय झाल्याचे दर्शवणारा अपेक्षित प्रतिदीप्ती (फ्लूरोसेन्स) दिसून आला.
यावरून हे औषध पुढील संशोधन आणि प्रमाणीकरणासाठी सुरक्षित असू शकते असा निष्कर्ष निघतो. रुग्णांवर या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यापूर्वी आणखी अभ्यासाची गरज आहे. हे संशोधन 'ACS- जर्नल ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री'मध्ये प्रकाशित झाले आहे.
प्रकाशन दुवा: https://doi.org/10.1021/acs.jmedchem.6c01286
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2301390)
अभ्यागत कक्ष : 114