पर्यटन मंत्रालय
एनआयडब्लूएस व आयआयटीटीएम गोवा येथे पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचा ऑनलाइन व्यवस्थापन विकास कार्यक्रम संपन्न
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 5:40PM by PIB Mumbai
पणजी, 18 ऑगस्ट 2026
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला दोन आठवड्यांचा ऑनलाइन व्यवस्थापन विकास कार्यक्रम, (एमडीपी) 17 ऑगस्ट 2026 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स अर्थात राष्ट्रीय जलक्रीडा संस्था व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट गोवा येथे संपन्न झाला.
या व्यापक कार्यक्रमात पर्यटन, व्यवस्थापन, नेतृत्व, प्रशासन आणि पर्यटनातील समकालीन मुद्दे यांसारख्या विविध पैलूंवर आधारित 40 सत्रांचा समावेश होता. व्यावसायिक क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या एमडीपी द्वारे सहभागींना त्यांच्या नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या आणि भविष्यातील करिअरमधील भूमिका पार पाडण्यास मदत करतील असे ज्ञान आणि दृष्टिकोन प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ सनदी, आयएएस अधिकारी, आयआयटीटीएम चे वरिष्ठ प्राध्यापक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते यांचा सहभाग होता. या सत्रांमधून सहभागींना शैक्षणिक अंतर्दृष्टी, प्रशासकीय अनुभव आणि उद्योग क्षेत्रातील दृष्टिकोन मिळाले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागींनी चर्चासत्रासाठी शोधनिबंध सादर केले, ज्यामुळे चिकित्सक विचार, संशोधनाभिमुखता आणि ज्ञान-आदानप्रदान यांसारख्या गोष्टींना चालना मिळाली.
समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या उपसचिव लालथामिबिगई के. यांनी भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि पर्यटन क्षेत्रातील प्रभावी नेतृत्वासाठी निरंतर शिक्षण व क्षमता बांधणीच्या महत्त्वावर भर दिला.
सहभागींनी या एमडीपी बाबत सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की, या कार्यक्रमामुळे त्यांना मौल्यवान अनुभव, नवीन दृष्टिकोन आणि व्यावहारिक ज्ञान मिळाले, जे त्यांच्या व्यावसायिक विकासात योगदान देईल आणि त्यांना उच्च जबाबदाऱ्या व नेतृत्वाच्या भूमिकांसाठी सज्ज करेल.
आयआयटीटीएम च्या संचालिका (प्रभारी) प्रा. मोनिका प्रकाश यांनी एमडीपी च्या यशस्वी पूर्ततेबद्दल सहभागींचे आणि आयोजन समितीचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनआयडब्लूएस – आयआयटीटीएम गोवाचे नोडल अधिकारी आणि कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. पवन गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, तर डॉ. चारू शीला यादव आणि डॉ. प्रशांत उदयकुमार यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
या एमडीपी ची यशस्वी पूर्तता ही क्षमता बांधणी, व्यावसायिक विकास आणि भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी मानवी संसाधने बळकट करण्याबाबतच्या आआयटीटीएम च्या निरंतर कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
पीआयबी पणजी | शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2300918)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English