ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक संस्थेच्या नागपूर शाखेच्या वतीने आयोजित भारतीय मानकांवरील मानक मंथन ही बैठक (तांत्रिक बैठक) यशस्वीपणे संपन्न

Posted On: 14 AUG 2026 9:11PM by PIB Mumbai

 

नागपूर इथे 13 ऑगस्ट 2026 रोजी सिलिकोमँगनीज तपशील विषयक भारतीय मानक क्र. 1470 : 2025 (पाचवी सुधारणा) तसेच लोखंड, पोलाद आणि मिश्र धातूंच्या ओतकाम कारखान्यांमध्ये ऑक्सिजनच्या वापरासंबंधीच्या कार्यपद्धतीच्या नियमावली विषयक धातूशास्त्र अभियांत्रिकी विभागाचा मसुदा मानक क्र. MTD 14 (34612) WC (पहिली सुधारणा) या विषयावर मानक मंथन (तांत्रिक बैठक) ही बैठक पार पडली. भारतीय मानक संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यालयाने या बैठकीचे आयोजन केले होते. भारतीय मानक संस्था (BIS - Bureau of Indian Standards) ही केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली देशाची राष्ट्रीय मानक संस्था आहे.

भारतीय मानक संस्थेच्या मानक गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर नुकत्याच सुधारणा केलेल्या तसेच नव्याने प्रकाशित झालेल्या आणि व्यापक प्रसारासाठी जारी केलेल्या मसुदा मानकांवर वेब पोर्टलद्वारे आपल्या टिप्पण्या तसेच अभिप्राय सादर करण्याच्या पद्धतीबद्दलची सविस्तर माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. अधिकाऱ्यांनी या मानक मंथन बैठकीच्या आयोजनामागचा मूळ उद्देशही उपस्थितांना सांगितला. भारतीय मानक क्र. 1470 : 2025 तसेच मसुदा मानक क्र. MTD 14 (34612) WC या मानकांच्या कार्यकक्षेबद्दल सविस्तर तपशील त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. यानंतर अधिकाऱ्यांनी सिलिकोमँगनीज तपशील विषयक भारतीय मानक क्र. 1470 : 2025 (पाचवी सुधारणा) आणि मसुदा मानक क्र. MTD 14 (34612) बद्दल सविस्तर सादरीकरणही केले.

या सादरीकरणानंतर, बैठकीला उपस्थित असलेल्या तज्ञांनी आणि प्रतिनिधींनी आपल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव तसेच शैक्षणिक ज्ञानाच्या आधारे या मानकांबद्दलची आपली मते व्यक्त केली. भारतीय मानकांमध्ये पुढील आवश्यक सुधारणा आणि कारवाई करण्याच्यादृष्टीने उपस्थितांकडून आलेल्या या विविध सूचना आणि मतांचे संकलनही केले गेले. यासोबतच या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांना भारतीय मानक संस्थेची मानके मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा कशी वापरावी, याबद्दलचे मार्गदर्शनही केले गेले. भारतीय मानक संस्थेचा परवाना (BIS License) मिळवण्याच्या प्रक्रियेबद्दलही उपस्थितांना माहिती दिली गेली. हा परवाना मिळवण्यासाठीचा अर्ज करण्याचे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले. एकंदरित हा संपूर्ण उपक्रम अत्यंत फलदायी ठरला. भविष्यातही तांत्रिक मुद्यांवरील अशा बैठकांचे आयोजन केले जावे अशी विनंती उपस्थितांनी केली. संस्थेच्या नागपूर शाखा कार्यालयाने या मागणीची दखलही घेतली.

भारतीय मानक संस्थेच्या नागपूर शाखा कार्यालयाचे संचालक आणि प्रमुख डॉ. मनोज कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2299717) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English