लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला केनियाचा पाठिंबा


केनियाच्या संसदीय प्रतिनिधीमंडळाने घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

भारत आणि केनिया यांच्यात हजारो वर्षांपासूनचे ऐतिहासिक आणि बहुआयामी संबंध असल्याचे लोकसभा  अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील नियमित उच्चस्तरीय परस्पर संवादामुळे परस्पर द्विपक्षीय संबंध सातत्याने दृढ होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

संसद भवन संकुलात आज केनियाच्या संसदेचे (नॅशनल असेंब्ली) अध्यक्ष डॉ.  मूसा एम. वेटांग'उला  यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली. द्विपक्षीय बैठकीत ओम बिर्ला यांनी दोन्ही देशांमधील संबंधाचा गौरव केला. या वर्षाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत 28 वी 'कॉमनवेल्थ स्पीकर्स अँड प्रिसायडिंग ऑफिसर्स कॉन्फरन्स' (CSPOC -राष्ट्रकुल देशांमधील संसदीय अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद ) पार पडली होती. या परिषदेत डॉ.   वेटांग'उला   यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे स्मरणही ओम बिर्ला यांनी केले.  डॉ.  वेटांग'उला   यांना सार्वजनिक जीवनाचा व्यापक अनुभव आहे, कायद्याचे क्षेत्र, कायदेमंडळ आणि प्रशासनात त्यांची उल्लेखनीय कारकीर्द राहिली आहे, तसेच केनियाच्या लोकांच्या कल्याणासाठी सुशासनाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले असल्याच्या शब्दांत ओम बिर्ला यांनी डॉ.   मूसा एम. वेटांग'उला   याच्या कार्यकतृत्वाचा गौरव केला.

या बैठकीत बिर्ला यांनी  भारत आणि केनियाच्या जनतेमधील शतकानुशतकांपासून चालत आलेले परस्पर संबंध अधोरेखित केले. केनिया सरकारने भारतीय वंशाच्या लोकांना तिथले मूळ रहिवासी समुदाय म्हणून मान्यता देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचेही बिर्ला यांनी स्वागत केले. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारत आणि केनिया हे दोन्ही देश लोकशाही, सर्वसमावेशक विकास आणि मानवकेंद्री प्रगतीला महत्त्व देणारे देश आहेत असे बिर्ला म्हणाले. या एकसामायिक दृष्टिकोनामुळे दोन्ही देशांमधील परस्पर द्विपक्षीय संबंध अधिक घनिष्ठ झाले असल्याचेही बिर्ला यावेळी म्हणाले. केनियाने वसाहतवादी राजवटीविरोधात दिलेल्या स्वातंत्र्यलढ्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव होता ही बाबही बिर्ला यांनी अधोरेखित केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जगभरात सत्य आणि अहिंसेच्या शांततापूर्ण लढ्याचे कालातीत प्रतीक मानले जाते असे बिर्ला म्हणाले. केनियाच्या संसदेत महात्मा गांधी यांचा पुतळा उभारायला सहमती दर्शवल्याबद्दल त्यांनी डॉ.  वेटांग'उला  यांचे आभारही मानले.

स्वातंत्र्यप्राप्तीपासून संविधानाचे मार्गदर्शन लाभलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाने व्यापक विकास आणि सामाजिक परिवर्तन घडवून दाखवले आहे यावर ओम बिर्ला यांनी अधिक भर दिला.  भारतातील निवडणूक प्रक्रियेत जनतेचा मोठ्या प्रमाणातील सहभाग दिसून येत असून सुमारे 970 दशलक्ष पात्र मतदारांपैकी सुमारे 650 दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावतात. लोकशाहीवर असलेली लोकांची श्रद्धा आणि विश्वास यातून दिसून येतो असे ते म्हणाले.

संसद हे लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे आणि नागरिकांच्या आशा-आकांक्षांना तेथे वाचा फुटते असे निरीक्षण नोंदवत अध्यक्ष  बिर्ला म्हणाले की, भारत आणि केनिया यांच्यातील संसदीय संवाद सातत्याने अधिक सशक्त होत आहे. दोन्ही देशांमध्ये संसदीय मैत्री गटांच्या स्थापनेचा संदर्भ देत त्यांनी, संसदीय प्रतिनिधीमंडळांदरम्यानच्या नियमित वैचारिक आदानप्रदानातून  दोन्ही देशांमध्ये असलेल्या संसदीय संबंधांना नवे आयाम मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. 

लोकशाहींसाठीच्या संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे (पीआरआयडीई) केनियाच्या संसदेच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करणारे कार्यक्रम केनियाच्या संसदेचे सदस्य तसेच अधिकाऱ्यांसाठी नियमितपणे आयोजित करण्यात येतात असे नमूद करून बिर्ला म्हणाले की बदलत्या जागतिक वातावरणाचा विचार करता, संसदीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य झाला आहे.  भारतीय संसदेने कामकाजातील पारदर्शकता, कार्यक्षमता, समावेशकता आणि लोकसहभाग यांना चालना देण्यासाठी कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला आहे. या क्षेत्रातील अनुभव केनियाच्या संसदेसोबत सामायिक करण्यात भारताला आनंदच होईल असे बिर्ला यांनी यावेळी सांगितले.

यावर प्रतिसाद देत,बिर्ला यांनी केलेल्या हार्दिक स्वागताबद्दल, डॉ. वेटांग'उला   यांनी त्यांचे आभार मानले. या वर्षीच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली 28वी सीएसपीओसी हा एक अत्यंत सुनियोजित संसदीय कार्यक्रम होता असे ते म्हणाले. भारतीय वंशाच्या लोकांनी केनियाच्या वाढीत आणि विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे हे त्यांनी नमूद केले.  केनियातील भारतीय समुदाय संसद आणि सरकारसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रीय आहे. दोन्ही देशांतील सशक्त संबंध. विशेषतः संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक बहुपक्षीय मंचावरील मजबूत नाते डॉ. वेटांग'उला   यांनी अधोरेखित केले. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत लोकशाहीवादी सुधारणा घडवून आणण्याची आणि 21 व्या शतकातील वास्तवाबाबत अधिक चांगल्या प्रकारे विचारमंथन करण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी सदस्य म्हणून भारताचा समावेश करण्याची मागणी देखील या मंचावरून केली.


सोनाली काकडे/तुषार पवार/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2299210) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati