आयुष मंत्रालय
पारंपरिक औषधांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता बळकट करण्यासाठी "एक वनस्पती, एक मानक": केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
औषधी वनस्पतींसाठी सुसंगत शास्त्रीय मानकांना बळकटी देण्यासाठी आंतर-मंत्रालयीन भागीदारी
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2026 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2026
आयुष मंत्रालयांतर्गत असलेला 'भारतीय औषध आणि होमिओपॅथी फार्माकोपिया आयोग' आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या 'भारतीय फार्माकोपिया आयोग' यांनी आज "एक वनस्पती, एक मानक" (One Herb, One Standard) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपल्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले.
नवी दिल्ली येथील कर्तव्य भवन येथे केंद्रीय आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत पीसीआयएमअँडएच चे प्रभारी संचालक डॉ. कौस्तुभ उपाध्याय आणि आयपीसीचे सचिव आणि वैज्ञानिक संचालक डॉ. व्ही. कलैसेल्वन यांच्यात या सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. भारताच्या आयुर्वेद, सिद्ध, सोवा-रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी या पारंपरिक औषध प्रणाली देशाच्या समृद्ध ज्ञान परंपरा आणि वनौषधी वारशाचा एक अविभाज्य भाग आहेत, असे त्यांनी सांगितले. वैज्ञानिकदृष्ट्या विकसित मानकांद्वारे औषधे आणि औषधी वनस्पतींची गुणवत्ता, शुद्धता आणि मानकीकरण सुनिश्चित करणे हे पारंपरिक औषधांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
प्रतापराव जाधव यांनी "एक वनस्पती, एक मानक" (One Herb, One Standard) दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध औषध प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या एकाच औषधी वनस्पतीसाठी एकच, स्पष्ट, वैज्ञानिक आणि विश्वासार्ह मानक प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. या सुसंगत मानकांमुळे भागधारकांमधील संभाव्य संभ्रम दूर होण्यास मदत होईल आणि औषधी वनस्पतींच्या मानकीकरणासाठी अधिक मजबूत आणि समन्वित चौकट तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक मानकांनुसार भारतीय मानके बळकट केल्याने भारतीय औषधी वनस्पती आणि उत्पादनांची गुणवत्ता तसेच विश्वासार्हता वाढेल आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक मान्यता मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. समान आणि स्पष्ट गुणवत्ता मानकांमुळे उत्पादक, निर्यातदार, चाचणी प्रयोगशाळा, नियामक संस्था आणि इतर भागधारकांसाठी प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, पारदर्शक आणि प्रभावी बनून 'व्यवसाय सुलभतेला' चालना मिळेल, असे ते म्हणाले.
मंत्रालये आणि संस्थांमधील समन्वित प्रयत्न औषधी वनस्पती आणि पारंपरिक औषधांचे मानकीकरण कसे मजबूत करू शकतात, हे या आंतर-मंत्रालयीन सहकार्यातून दिसून येते, असे ते म्हणाले. हा उपक्रम भारताची समृद्ध जैवविविधता आणि पारंपरिक औषध वारशाचे संरक्षण करण्यास मदत करेल, तसेच औषधी वनस्पती, पारंपरिक औषधे आणि त्यांच्या गुणवत्ता मानकांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह मानक-निर्धारक म्हणून भारताचे स्थान मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नूतनीकरण केलेला हा सामंजस्य करार पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी आंतर-मंत्रालयीन सहकार्य सुरू ठेवेल. आयुर्वेद, सिद्ध, सोवा-रिग्पा, युनानी आणि होमिओपॅथी औषध प्रणालींमध्ये वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य घटकांसाठी एकसमान, विश्वासार्ह आणि वैज्ञानिकदृष्ट्या मजबूत गुणवत्ता मानके विकसित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298673)
आगंतुक पटल : 21