संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदलाचा संयुक्त स्फोटक साहित्य निकामी करण्यासंदर्भातील सराव 2026, कोची येथील दक्षिण नौदल मुख्यालयात होणार सुरू

Posted On: 09 AUG 2026 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2026

 

भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदल यांच्यातील स्फोटक आयुध विल्हेवाट सराव - 2026, येत्या 10 ते 14 ऑगस्ट 2026 दरम्यान कोची इथल्या दक्षिण नौदल कमांडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही नौदलांमधील विशेष प्रशिक्षित डायव्हिंग आणि स्फोटक आयुध विल्हेवाट पथकांमध्ये परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि व्यावसायिक सहकार्य अधिक बळकट करणे, हा या द्विपक्षीय सरावाचा उद्देश आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या सरावात विषयतज्ज्ञांचे चर्चासत्र, परस्पर प्रशिक्षण, उपकरणांची प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष प्रसंगांवर आधारित सराव यांचा समावेश असेल. या कार्यक्रमामुळे स्फोटक साहित्य निकामी करण्याच्या आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींचे आदानप्रदान होण्यास मदत होईल. तसेच, दोन्ही नौदलांना एकमेकांची क्षमता, कार्यान्वयनाच्या संकल्पना आणि कार्यशैली समजून घेण्याची संधी यात उपलब्ध होणार आहे.

हा सराव सहकार्यात्मक शिक्षण आणि परस्पर समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी आखण्यात आला आहे. यामुळे दोन्ही नौदलांच्या सैनिकांना आपल्या कार्यपद्धती अधिक विकसित करण्यास, परस्पर समज वाढवण्यास आणि स्फोटक साहित्य निकामी करण्याच्या आव्हानात्मक व बदलत्या परिस्थितीला प्रभावीपणे तोंड देण्याची क्षमता बळकट करण्यास मदत होईल.

भारतीय नौदल आणि अमेरिकन नौदल 2005 पासून संयुक्त बचावकार्य आणि स्फोटक आयुध विल्हेवाट सराव आयोजित करत आहेत. आगामी सराव हा या विशेष द्विपक्षीय प्रशिक्षण सरावाची आठवी आवृत्ती असून, दोन्ही नौदलांची परस्पर कार्यक्षमता वाढवणे, कार्यानुभवाची देवाणघेवाण करणे आणि विशेष सागरी मोहिमांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याप्रती असलेली दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित करणारा आहे.

 

* * *

राधिका अघोर/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296915) अभ्यागत कक्ष : 55