भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने 2026 च्या ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे केले आयोजन
ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांनी स्वीकारले ‘अक्षय ऊर्जा बाजारपेठांसह निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य मजबूत करणे’ या विषयावरील संयुक्त निवेदन
परस्परांशी अधिकाधिक जोडलेल्या बाजारपेठांमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी स्पर्धा अंमलबजावणी, सहकार्य, संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या कटिबद्धतेचा ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांनी केला पुनरुच्चार
Posted On:
09 AUG 2026 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2026
भारताच्या 2026 च्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत, भारतीय स्पर्धा आयोगाने 8 ऑगस्ट 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांमधील स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले. निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्पर्धा कायदा आणि धोरणातील उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली.

उद्घाटनपर भाषणात भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षा रवनीत कौर यांनी कार्यक्षमता, ग्राहक कल्याण, नवोन्मेष आणि गुणवत्तेच्या आधारावर व्यवसायांना स्पर्धा करण्याच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या स्पर्धात्मक बाजारपेठांचे संरक्षण आणि प्रोत्साहन करण्याची ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांची सामायिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
डिजिटल बाजारपेठा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक सीमापार होत असल्याचे नमूद करत भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले की, स्पर्धा अंमलबजावणीसाठी माहितीपूर्ण, प्रभावी आणि भविष्यासाठी सज्ज दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांमध्ये सातत्यपूर्ण सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण आवश्यक आहे.
अक्षय ऊर्जा आणि शाश्वततेकडे होत असलेल्या जागतिक संक्रमणाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांमधील सातत्यपूर्ण सहकार्यामुळे निष्पक्ष आणि स्पर्धात्मक अक्षय ऊर्जा बाजारपेठांना प्रोत्साहन मिळेल तसेच शाश्वत विकास आणि ऊर्जा सुरक्षेच्या सामायिक उद्दिष्टांना पुढे नेण्यास मदत होईल. जागतिक बाजारपेठेमधील बदलती परिस्थिती आणि अंमलबजावणीसमोरील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा कायद्याशी संबंधित हस्तक्षेप तत्त्वनिष्ठ, पुराव्यांवर आधारित आणि स्पर्धा कायद्याच्या मूलभूत उद्दिष्टांशी दृढपणे जोडलेले असले पाहिजेत, यावरही त्यांनी भर दिला.
बैठकीदरम्यान ब्रिक्स देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांनी आपापल्या देशांमधील स्पर्धा कायदा आणि धोरणाशी संबंधित विचारांची देवाणघेवाण केली. यामध्ये महत्त्वपूर्ण अंमलबजावणी उपक्रम, संस्थात्मक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठांमधील उदयोन्मुख आव्हानांचा समावेश होता.

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत भारतीय स्पर्धा आयोगाने ‘ब्रिक्समधील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील उदयोन्मुख स्पर्धात्मक परिस्थिती’ या विषयावर संयुक्त ब्रिक्स अभ्यासाचे नेतृत्व केले. ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या स्पर्धात्मक परिस्थितीचे अधिक चांगले आकलन करून घेणे आणि भविष्यातील सहकार्यासाठी क्षेत्रे निश्चित करणे हा या अभ्यासाचा उद्देश होता. या अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष बैठकीदरम्यान सादर करण्यात आले.
बैठकीत ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांनी ‘अक्षय ऊर्जा बाजारपेठांसह निष्पक्ष स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य मजबूत करणे’ या शीर्षकाचे संयुक्त निवेदन स्वीकारले. या संयुक्त निवेदनातून स्पर्धात्मक, नवोन्मेषी, सक्षम आणि शाश्वत नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठांना प्रोत्साहन देण्याची तसेच जागतिक ऊर्जा संक्रमणाशी संबंधित उदयोन्मुख स्पर्धात्मक मुद्द्यांना सामोरे जाण्यासाठी ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्याची सामायिक कटिबद्धता व्यक्त करण्यात आली.
ब्राझीलच्या आर्थिक संरक्षणासाठी प्रशासकीय परिषद अर्थात कॅडने 2027 मध्ये ब्राझील इथे आयोजित करण्यात येणाऱ्या 10 व्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषदेच्या तयारीबाबत सहभागी प्रतिनिधींना माहिती दिली.
ब्रिक्स स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या समारोपाच्या भाषणाने बैठकीची सांगता झाली. परस्परांशी अधिकाधिक जोडलेल्या बाजारपेठांमधील उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी स्पर्धा अंमलबजावणी, सातत्यपूर्ण सहकार्य, संवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा सर्व प्रमुखांनी पुनरुच्चार केला.
* * *
राधिका अघोर/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296889)
अभ्यागत कक्ष : 63