ऊर्जा मंत्रालय
भारत आणि भूतान यांनी ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि भूतानचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योनपो गेम त्शेरिंग यांनी ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर केली व्यापक चर्चा
Posted On:
07 AUG 2026 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज नवी दिल्लीत भूतानचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री ल्योनपो गेम त्शेरिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

या बैठकीत भारत आणि भूतान यांच्यात ऊर्जा क्षेत्रातील विशेष आणि चिरस्थायी भागीदारीची पुष्टी करण्यात आली, जी दोन्ही देशांमधील घनिष्ट द्विपक्षीय संबंधांचा आधारस्तंभ राहिली आहे. दोन्ही मंत्र्यांनी सध्याच्या सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
दोन्ही मंत्र्यांनी जलविद्युत विकास, सीमापार वीज व्यापार, पारेषण जोडणी, नवीकरणीय ऊर्जा, संस्थात्मक सहकार्य आणि क्षमता उभारणी या विषयांवर विस्तृत चर्चा केली. ऊर्जा क्षेत्रात नियमित संवाद सुलभ करण्यासाठी तसेच सहकार्य वाढवण्यासाठी स्थापित केलेल्या द्विपक्षीय संस्थात्मक यंत्रणांअंतर्गत झालेल्या प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला. प्रामुख्याने चर्चा झालेल्या प्रमुख जलविद्युत प्रकल्पांमध्ये पुनात्सांगछू-1, पुनात्सांगछू-2, संकोश आणि चुखा यांचा समावेश होता.

शाश्वत विकास आणि प्रादेशिक ऊर्जा सुरक्षेला चालना देण्यासाठी ऊर्जा सहकार्याचे महत्त्व लक्षात घेऊन दोन्ही बाजूंनी निरंतर संवाद, घनिष्ट समन्वय आणि परस्पर फायदेशीर उपक्रमांच्या वेळेवर अंमलबजावणीद्वारे सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
मनोहर लाल यांनी ऊर्जा क्षेत्रात भारत-भूतान दीर्घकालीन भागीदारीला पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. माननीय ल्योनपो गेम त्शेरिंग यांनी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले आणि ऊर्जा भागीदारीचा आणखी विस्तार करण्याची भूतानची वचनबद्धता व्यक्त केली.
द्विपक्षीय ऊर्जा सहकार्यात झालेल्या प्रगतीबाबत दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या हितासाठी भारत-भूतान भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या आपल्या सामायिक संकल्पाचा पुनरुच्चार करत ही बैठक सकारात्मक वातावरणात संपन्न झाली.
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296320)
अभ्यागत कक्ष : 40