सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
नशामुक्त भारत अभियान देशभरातल्या 29 कोटी 5 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 10:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
जनजागृती, लोकसहभाग आणि व्यसनमुक्तीसाठी अधिक बळकट पायाभूत सुविधांच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी, केंद्र सरकारकडून देशभरात नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी देशातील निवडक 272 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा विस्तार ऑगस्ट 2023 पासून देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला.

उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठे आणि शाळांवर यात विशेष भर देण्यात आला आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी राज्यसभेत कनाद पुरकायस्थ आणि बाबूभाई जेसंगभाई देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत देशभरात राबविण्यात आलेल्या व्यापक जनजागृती आणि संपर्क उपक्रमांद्वारे 29 कोटी 5 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना जागरूक करण्यात आले आहे. यामध्ये 11 कोटी 5 लाखांहून अधिक युवक आणि 7 कोटी 81 लाख महिलांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
अमली पदार्थांची मागणी कमी व्हावी यासाठी राष्ट्रीय कृती आराखड्या अंतर्गत, मंत्रालयामार्फत सध्या 145 जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रे, व्यसनाधीनांसाठीची 344 एकात्मिक पुनर्वसन केंद्रे , 76 आउटरीच आणि ड्रॉप-इन केंद्रे, 45 समुदाय-आधारित समवयस्क नेतृत्वाखालील हस्तक्षेप केंद्रे आणि 155 व्यसन उपचार सुविधा केंद्रांना सहाय्य दिले जात आहे, असे लेखी उत्तरात पुढे नमूद करण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे प्रभावित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती, समुपदेशन, मार्गदर्शन, प्रेरणा तसेच आवश्यक सेवांसाठी संदर्भ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयाने राष्ट्रीय टोल-फ्री व्यसनमुक्ती हेल्पलाईन -14446 सुरू केल्याची माहितीही सभागृहाला देण्यात आली. या हेल्पलाईनद्वारे जवळच्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रांशी संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. या हेल्पलाईनवर आतापर्यंत 4 लाख 60 हजारांहून अधिक दूरध्वनी आले आहेत.
राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित घटकांच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सातत्याने जनजागृती आणि संपर्क कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. लोकसहभाग अधिक बळकट करण्यासाठी आणि तळागाळात जनजागृतीला चालना देण्यासाठी, नशामुक्त भारत अभियान अंततर्गत मंत्रालयाने देशव्यापी नशामुक्ती मित्र जाळे उभारले आहे. आतापर्यंत 1 लाख 17 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी नशामुक्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे.
सुषमा काणे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295822)
आगंतुक पटल : 8