अर्थ मंत्रालय
करदाता सेवा महासंचालनालय,मुंबई विभागीय कक्ष आणि बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या सहयोगाने जीएसटीची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन
Posted On:
05 AUG 2026 6:00PM by PIB Mumbai
मुंबई, 5 ऑगस्ट 2026
जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कायद्याची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई विभागीय कक्षाने बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या सहकार्याने, 5 ऑगस्ट, 2026 रोजी परिसंवादाचे आयोजन केले. वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील मूलभूत संकल्पनांविषयी विद्यार्थी, उद्योजक होऊ इच्छिणारे युवा तसेच इतर संबंधित घटकांमध्ये जनजागृती करणे, करसाक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रबांधणी, आर्थिक विकास तसेच जबाबदार नागरिकत्वामध्ये करप्रणालीची भूमिका समजावून देणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. अशा संयुक्त जनजागृती उपक्रमांद्वारे शैक्षणिक अध्ययन आणि व्यावहारिक ज्ञान यांमध्ये दुवा निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना, डीजीटीएस, मुंबई विभागीय कक्षाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी विद्यार्थ्यांना जीएसटीच्या मूलभूत तत्त्वांचे व्यावहारिक ज्ञान मिळावे आणि युवांमध्ये करसाक्षरतेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी जीएसटी ही देशाच्या अप्रत्यक्ष करप्रणालीतील एक ऐतिहासिक सुधारणा असल्याचे सांगितले. एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करून, करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि उद्योग-व्यवसाय सुलभतेला चालना देण्यात जीएसटीची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जीएसटीचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययनाला बळकटी देण्याबरोबरच करप्रणाली, वित्त, कायदा, लेखांकन आणि लोकप्रशासन या क्षेत्रांतील करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी संवादी सत्रात सक्रिय सहभाग नोंदवून या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रधान मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई विभाग यांच्या कार्यालयातील उपायुक्त दीपक माता यांनी एक सत्र घेतले. त्यांनी वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा सविस्तर आढावा घेत तिची घटनात्मक चौकट, प्रमुख वैशिष्ट्ये, कर आकारणी आणि वसुलीची यंत्रणा, इनपुट टॅक्स क्रेडिट, जीएसटी परिषद, अनुपालनाशी संबंधित आवश्यकता तसेच जीएसटीमधील उदयोन्मुख प्रवाह यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषणाचा वापर, इनव्हॉइस मॅनेजमेंट सिस्टीम, करदात्यांसाठी सुलभता उपाययोजना तसेच जीएसटी अंतर्गत विकसित होत असलेल्या डिजिटल व्यवस्थेसह अलीकडील तांत्रिक प्रगतीविषयी माहिती दिली. या सत्राची सांगता चर्चेने झाली. यावेळी सहभागींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

या परिसंवादाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर सहभागींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पीआयबी मुंबई |राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2295045)
अभ्यागत कक्ष : 22