शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेवरील तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन


दुर्मिळ हस्तलिखिते आणि भारताचा साहित्यिक वारसा प्रदर्शित करणाऱ्या या प्रदर्शनाचे कुलगुरू प्रा.कुमुद शर्मा यांनी केले कौतुक

Posted On: 05 AUG 2026 5:54PM by PIB Mumbai

नागपूर, 5 ऑगस्ट 2026 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीची सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'अखिल भारतीय शिक्षा समागम 2026' चा एक भाग म्हणून, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी विद्यापीठ परिसरातील अटलबिहारी वाजपेयी भवनातील 'स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयात' कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 6 ऑगस्ट 2026 पर्यंत अभ्यागतांसाठी खुले राहणार आहे.

या उद्घाटन समारंभाला कुलसचिव कादर नवाझ खान, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गाडेवार, वित्त अधिकारी पी. सरदार सिंग, प्रॉक्टर डॉ. राकेश मिश्रा, जनसंवाद विभागाचे प्रा. कृपाशंकर चौबे, विधी विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. जनार्दन कुमार तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी दुर्मिळ हस्तलिखिते आणि अभिलेखागारातील संग्रहांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध बौद्धिक व साहित्यिक वारसा सर्वांसमोर आणणाऱ्या  या प्रदर्शनाची प्रशंसा केली.  तरुण पिढीला देशाच्या चिरंतन ज्ञानपरंपरेशी जोडण्यात असे  उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात असे त्यांनी नमूद केले.

संग्रहालयाचे प्रभारी डॉ.अमित विश्वास यांनी प्रदर्शनात मांडलेली दुर्मिळ हस्तलिखिते, ऐतिहासिक नियतकालिके आणि इतर मौल्यवान अभिलेखीय साहित्याविषयी अभ्यागतांना माहिती दिली.

या प्रदर्शनात विद्यापीठाच्या संग्रहालयात जतन केलेल्या, एकोणिसाव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा हस्तलिखितांचा आणि नियतकालिकांचा अमूल्य संग्रह प्रदर्शित केला आहे.  हा दुर्मिळ साहित्यिक ठेवा अभ्यागतांना भारताच्या साहित्यिक आणि बौद्धिक परंपरांचा जिवंत वारसा अनुभवण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.

या प्रदर्शनातील उल्लेखनीय गोष्टींमध्ये 'हनुमान बाहुक', 'विजय दोहावली', 'विनय पत्रिका' (टीका-टिप्पणीसह आवृत्ती), 'षोडश रामायण' आणि 'कुंडलिय रामायण' यांसारख्या हस्तलिखितांचा, तसेच विद्यापीठाने जतन केलेल्या इतर हजारो महत्त्वाच्या हस्तलिखितांचा समावेश आहे. हा  संग्रह भारताच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाची समृद्धता दर्शवतो , तसेच हिंदी साहित्य आणि भारतीय ज्ञान-परंपरेच्या विकासाविषयी महत्वाची  माहिती पुरवतो.

आपल्या संग्रहालयातील संग्रहांच्या माध्यमातून भारताचा साहित्यिक वारसा जतन आणि संवर्धन करण्याचे  विद्यापीठाचे प्रयत्न हे प्रदर्शन अधोरेखित करते. विद्यापीठाने शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक, विद्यार्थी व संशोधकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आणि भारताच्या सांस्कृतिक व बौद्धिक वारशाच्या या अद्वितीय भांडाराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

पीआयबी मुंबई | आशिष सांगळे /सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2295021) अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein: English