कृषी मंत्रालय
गुईरीम येथे शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आयसीएआर-केव्हीकेकडून गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक
Posted On:
05 AUG 2026 4:08PM by PIB Mumbai
गोवा/ पणजी, 5 ऑगस्ट 2026
शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आयसीएआर–कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), उत्तर गोवा, आयसीएआर–केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय), जुने गोवा यांच्या वतीने 29 जुलै रोजी बार्देश तालुक्यातील गुईरीम येथे गांडूळखत निर्मिती व त्याचा प्रत्यक्ष वापर या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषीशास्त्रज्ञ श्री. राहुल कुमार यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गांडूळखत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. यामध्ये योग्य सेंद्रिय कच्चा माल निवडणे, आवश्यक आर्द्रता राखणे, गांडुळांची भूमिका, सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि दर्जेदार गांडूळखताची निर्मिती व संकलन या सर्व टप्प्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक, किफायतशीर व शाश्वत शेतीसाठी गांडूळखत या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा उद्देश शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रोक्त गांडूळखत निर्मितीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच शाश्वत पोषण व्यवस्थापनाच्या प्रभावी तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता.

या प्रात्यक्षिकात गुईरीम येथील सेंट अँथनी हायस्कूल मधील विद्यार्थी तसेच परिसरातील शेतकऱ्यांसह एकूण 24 जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्त्रोत-आयसीएआर-सीसीएआरआय,गोवा/ पीआयबी पणजी | अंबादास यादव/ प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2294858)
अभ्यागत कक्ष : 34