दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
"अ लेटर टू मदर अर्थ : माय प्रॉमिस टू प्रोटेक्ट नेचर" या विषयावरील स्पर्धेसाठी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार
Posted On:
04 AUG 2026 7:28PM by PIB Mumbai
गोवा/ पणजी, 4 ऑगस्ट 2026
भारतीय टपाल विभागाने 2026-27 या वर्षासाठी राष्ट्रीय 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धा सुरू केली असून, गोव्यासह देशभरातील नागरिकांना या प्रतिष्ठित हस्तलिखित पत्रलेखन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेली ही स्पर्धा 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत खुली राहणार आहे.
यंदाच्या स्पर्धेचा विषय "अ लेटर टू मदर अर्थ : माय प्रॉमिस टू प्रोटेक्ट नेचर" असा असून, पर्यावरण संवर्धन व शाश्वत जीवनशैलीबाबतची आपली भावना आणि बांधिलकी हस्तलिखित पत्राद्वारे व्यक्त करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही स्पर्धा 18 वर्षांपर्यंत आणि 18 वर्षांवरील अशा दोन वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक गटात इनलँड लेटर कार्ड (ILC) आणि लिफाफा (Envelope) असे दोन विभाग आहेत.
स्पर्धक इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत हस्तलिखित पत्र पाठवू शकतात. लिफाफा विभागातील पत्र 1,000 शब्दांपर्यंत साध्या A-4 आकाराच्या कागदावर लिहून मुद्रांकित (Embossed) लिफाफ्यात किंवा आवश्यक टपाल तिकीट लावलेल्या लिफाफ्यात पाठवावे. इनलँड लेटर कार्ड (ILC) विभागातील पत्र 500 शब्दांपर्यंत असावे. सर्व प्रवेशिका मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ, मुंबई – 400001 यांच्याकडे पाठवाव्यात. लिफाफा किंवा ILC वर "DHAI AKHAR Letter 2026" असे नमूद करणे आवश्यक आहे.
स्पर्धकांनी आपल्या पत्रात "01/01/2026 रोजी माझे वय 18 वर्षांखालील किंवा 18 वर्षांवरील आहे," असे वयाचे प्रमाणपत्रही नमूद करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र परिमंडळ (महाराष्ट्र व गोवा) तसेच राष्ट्रीय स्तरावर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. परिमंडळ स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ₹25,000, ₹10,000 आणि ₹5,000, तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ₹50,000, ₹25,000 आणि ₹10,000 अशी पारितोषिके प्रदान केली जातील. परिमंडळ स्तरावरील निकाल 31 डिसेंबर 2026 पर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत.
गोवा राज्यातील विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, निसर्गप्रेमी तसेच नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन गोवा विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक यांनी केले आहे.
स्पर्धेच्या सविस्तर नियमावली व माहितीसाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा. 31 ऑक्टोबर 2026 नंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

स्रोत : वरिष्ठ टपाल अधीक्षक, गोवा विभाग / PIB पणजी | अंबादास यादव/ प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2294533)
अभ्यागत कक्ष : 65