युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’मध्ये गोव्यातील फोंडा येथे युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

Posted On: 02 AUG 2026 6:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’अंतर्गत ‘माय भारत’, गोवा यांनी फोंडा येथील पीईएस कला व विज्ञान महाविद्यालयाच्या सहकार्याने पंतप्रधानांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधनाचे थेट प्रक्षेपण आयोजित केले.

या कार्यक्रमाला गोवा सरकारचे जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, फोंडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रितेश रवी नाईक, फोंडा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या प्रा. सेलिना नाझरेथ, ‘माय भारत’ गोवाचे संचालक जी. एस. राघव आणि सहाय्यक संचालक सम्यक मेश्राम उपस्थित होते.

कार्यक्रमात सुमारे 320 ‘माय भारत’ स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी अमली पदार्थमुक्त भारताच्या संकल्पनेला पाठिंबा देण्याची आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याची शपथ घेतली.

देशभरातील ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’चा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 28,000 हून अधिक ठिकाणांहून सहभागी झालेल्या 1 कोटीहून अधिक युवकांना संबोधित केले. निरोगी, आत्मविश्वासपूर्ण आणि व्यसनमुक्त युवा पिढीशिवाय विकसित भारताची निर्मिती शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून आपल्या शाळा, महाविद्यालये आणि समाजात व्यसनमुक्ती अभियानाचे दूत बनावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आगामी 100 रविवारी हे अभियान विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, ध्यानसाधना आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून त्यातून युवकांचा व्यापक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांनीही या अभियानात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करत पंतप्रधानांनी शिक्षक आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर नियमित संवाद साधावा, असे सांगितले. व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींना आधार व पुनर्वसन मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध सरकार कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी युवकांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याचा तसेच ‘नशामुक्त गोवा’ आणि ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2293507) अभ्यागत कक्ष : 42
Read this releasein: English