संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे भारताच्या स्वातंत्र्याच्या 79 वर्षांच्या गौरवार्थ सायक्लोथॉन 2026 चे आयोजन
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2026 12:54PM by PIB Mumbai
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या 79 वर्षांच्या गौरवार्थ राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे आज नवी दिल्लीत सायक्लोथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले. युवकांनी तंदुरुस्ती, पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारावी, तसेच देशभक्ती, शिस्त, एकात्मता आणि राष्ट्रसेवा ही राष्ट्रीय छात्रसेनेची मूलभूत मूल्ये अधिक दृढ व्हावीत, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या सायक्लोथॉनला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, प्रख्यात मुष्टियोद्धा एम. सी. मेरी कोम आणि प्रख्यात टेनिसपटू लिएंडर पेस उपस्थित होते. राष्ट्रीय छात्रसेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांच्या नेतृत्वाखाली 79 एनसीसी छात्रसैनिकांच्या पथकाने भारताच्या स्वातंत्र्याच्या 79 वर्षांच्या स्मरणार्थ प्रतीकात्मक 79 किलोमीटर सायकल फेरी पूर्ण केली. या उपक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडासंकुलामधून झाली आणि राष्ट्रीय राजधानीतील प्रमुख स्थळांमधून निर्धारित मार्ग यशस्वीपणे पूर्ण करून त्याच ठिकाणी समारोप झाला.


"स्वच्छ भारत, हरित भारत, तंदुरुस्त भारत" या संकल्पनेवर आधारित या सायक्लोथॉनद्वारे राष्ट्रीय छात्रसेनेने टीबी मुक्त भारत, स्वच्छ भारत, `एक पेड माँ के नाम` आणि `हर घर तिरंगा` यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. या उपक्रमातून सहभागी आणि सर्वसामान्य नागरिकांना सायकलचा पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीचे साधन म्हणून स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धन, कार्बन उत्सर्जनात घट आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला.


केवळ क्रीडा उपक्रमापुरता मर्यादित न राहता, एनसीसी सायक्लोथॉन 2026 हा शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन,रस्ते सुरक्षा आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत जनजागृती करण्याचा प्रभावी मंच ठरला. शिस्त, संघभावना, चिकाटी आणि समाजसेवा यांचा स्वीकार करून युवकांनी सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे दूत बनावे आणि अधिक सक्षम, निरोगी व हरित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, अशी प्रेरणा या उपक्रमातून देण्यात आली.
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2293448)
आगंतुक पटल : 12