वस्त्रोद्योग मंत्रालय
12 व्या राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यासाठी सोलापुरात कार्यक्रम
विणकर सेवा केंद्र, मुंबईतर्फे 7 ऑगस्ट रोजी दिवसभराच्या कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
29 JUL 2026 8:15PM by PIB Mumbai
मुंबई,29 जुलै 2026
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत, विकास आयुक्त हातमाग कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विणकर सेवा केंद्र (डब्ल्यूएससी), मुंबईने 12 व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत रामचंद्र बुरला मंगल कार्यालय, सोलापूर इथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हातमाग क्षेत्राचे महत्त्व आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासातील त्याचे योगदान याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. तसेच, हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देणे, हातमाग विणकरांचे उत्पन्न वाढविणे आणि भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेबद्दल अभिमानाची भावना दृढ करणे ही देखील या दिनाच्या आयोजनाची उद्दिष्टे आहेत.
राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विकास आयुक्त, हातमाग, यांचे कार्यालय आठवडाभर विविध उपक्रम राबवणार आहे. यामध्ये प्रदर्शने, समाज माध्यमांवर जनजागृतीपर मोहिमा, लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन तसेच हातमाग क्षेत्राच्या प्रसारासाठी विविध प्रचारात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे. सोलापुरातील कार्यक्रम हा देशातील प्रमुख हातमाग केंद्रांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रादेशिक उत्सवाचा भाग आहे.
सोलापुरातील कार्यक्रमात हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय उपक्रमांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये विकास विभागस्तरीय कार्यक्रम, इंडिया हँडलूम ब्रँड, हँडलूम मार्क, प्रधान मंत्री मुद्रा योजना, विमा योजना, ई-कॉमर्स उपक्रम, ई-धागा आणि जीआय टॅग याविषयी माहिती दिली जाईल. या कार्यक्रमात स्थानिक यशोगाथांचे कथन, हातमाग विणकरांशी संवाद, मुंबई विणकाम सेवा केंद्राचे हातमाग नक्षीकाम, नमुने आणि उत्पादनांचे प्रदर्शन यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संत कबीर पुरस्कार विजेते, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्रधारक, डिझाइनर्स, वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विणकर सेवा केंद्र, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील राज्यभरातील हातमाग विणकर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि हातमाग विणकरांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
ही माहिती भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत विकास आयुक्त, हातमाग, कार्यालयाच्या अखत्यारितील विणकर सेवा केंद्र, मुंबईचे संचालक (पश्चिम विभाग) जवाहरलाल कुन्सोथ यांनी दिली.
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291420)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English