इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकार सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) योजनेच्या माध्यमातून कोल्हापूरची माहिती तंत्रज्ञान परिसंस्था बळकट करत आहे


कोल्हापूरने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया योजनेअंतर्गत 241.49 कोटी रुपयांच्या आयटी निर्यातीची नोंद केली

Posted On: 29 JUL 2026 5:31PM by PIB Mumbai

मुंबई, 29 जुलै 2026

केंद्र सरकार देशभरात विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देत असून यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया योजनेचा देखील समावेश आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 73 केंद्र स्थापन करण्यात आली असून त्यापैकी सात केंद्र ही महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर येथे आहेत. कोल्हापूर येथील एसटीपीआय केंद्र सुमारे 6,600 चौरस फूट बांधकाम क्षेत्रात उभारण्यात आले असून, स्टार्ट-अप्स आणि उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी हे केंद्र 62 पूर्णपणे सुसज्ज प्लग-अँड-प्ले इनक्युबेशन जागा, परिषद आणि  बैठकीच्या खोल्या, एक नेटवर्क ऑपरेशन्स सेंटर (एनओसी) आणि इतर पायाभूत सुविधांनी सज्ज आहे.

याशिवाय येथे इनक्युबेशन, क्लाउड सेवा, उच्च-गती डेटा संप्रेषण आणि वैधानिक सहाय्य अशा सुविधांसोबतच उद्योग तज्ञ, उद्यम भांडवलदार आणि एनआयटी आणि आयआयटीमधील मार्गदर्शकांसोबत थेट संवाद साधण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान, कोल्हापूर येथील सात नोंदणीकृत एसटीपीआय केंद्रांनी 241.49 कोटी रुपयांच्या माहिती तंत्रज्ञान विषयक निर्यातीची नोंद केली असून या प्रदेशातील वाढत्या माहिती तंत्रज्ञान परिसंस्थेचे ते द्योतक आहे. 

महाराष्ट्र सरकार देखील राज्य माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत वित्तीय आणि गैरवित्तीय प्रोत्साहनपर उपाययोजनांमधून  या क्षेत्राला पाठिंबा देत असून यामध्ये कर सवलती आणि वीज दरातील सवलतीचा समावेश आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कोल्हापूर मध्ये वर्ष 2003 मध्ये 1.60 हेक्टर क्षेत्रावर आय टी पार्क उभारले असून या आयटी पार्कमधील तीन निर्धारित भूखंडांवर आयटी उद्योग पूर्णपणे कार्यरत आहेत. सध्या कोल्हापूर शहरात 372 आयटी/आयटीईएस उद्योग कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे 9,000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री  जितीन प्रसाद यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2291248) अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein: English