आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत व्हिडिओ युरोडायनामिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन, महाराष्ट्रतील शासकीय रुग्णालयांमधील अशाप्रकारची पहिलीच अत्याधुनिक सुविधा

Posted On: 28 JUL 2026 8:10PM by PIB Mumbai

नागपूर, 28 जुलै 2026

 

नागपूर इथल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या मूत्ररोग विज्ञान विभागात इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG - मज्जातंतू आणि स्नायूंच्या हालचाली व कार्यक्षमता तपासणारी चाचणी) आणि यूरेथ्रल प्रेशर प्रोफाइलोमेट्री (UPP - मूत्रमार्गातील दाबाची पातळी मोजणारी चाचणी) या सुविधांनी सज्ज असलेली व्हिडिओ युरोडायनामिक्स प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) प्रशांत पी. जोशी यांच्या हस्ते या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश नागदेवे, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. रसिका गडकरी, अधिष्ठाता (विद्यार्थी कल्याण) डॉ. सिद्धार्थ दुभाषी , मूत्ररोग विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि प्रभारी डॉ. चंद्रकांत मुंजेवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रयोगशाळेची सुरुवात ही मूत्रमार्गाशी संबंधीत जटील विकारांचे निदान आणि उपचाराच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे यश ठरले आहे.

युरोडायनामिक्स ही मूत्राशय मूत्र  कसे  साठवते आणि शरीराबाहेर कसे बाहेर टाकते, याचे मूल्यमापन करणारी एक विशेष तपासणी पद्धती असते. आता नव्याने सुरू केलेल्या या प्रयोगशाळेत मूत्राशयाच्या कार्यक्षमतेची अत्यंत प्रगत स्वरुपात तपासणी करण्यासाठीची व्हिडिओ युरोडायनामिक्स सुविधा उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत दाबाच्या मोजणीसोबतच वास्तव वेळेतील क्ष - किरणीय चित्रण केले जाते. यामुळे मूत्राशय आणि मूत्रमार्गाची रचना तसेच कार्यप्रणालीचे समांतरपणे अचूक मूल्यमापन करणे शक्य होते. यासोबतच, या प्रक्रियेत इलेक्ट्रोमायोग्राफीची (EMG) जोडही दिली गेली आहे. यामुळे ओटीपोटाच्या तळाशी असलेल्या स्नायू (पेल्विक फ्लोअर) आणि मूत्रपिंडाच्या स्नायूंमधील समन्वयाने होणाऱ्या कार्याची तपासणी करता येते. यासोबतच यूरेथ्रल प्रेशर प्रोफाइलोमेट्रीद्वारे (UPP) मूत्रमार्गाच्या क्षमतेचे मूल्यमापन केले जाते. या सर्व प्रगत यंत्रणांच्या एकत्रित वापरामुळे जटील स्वरुपाच्या मूत्र विकारांसंबंधीचे अचूक निदान करणे आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक पातळीवरील उपचारांचे नियोजन करणे  शक्य होणार आहे.

आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी ही अत्याधुनिक युरोडायनामिक्स तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विदर्भ आणि लगतच्या राज्यातील रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. यामुळे रुग्ण आणि गरजुंना खाजगी रुग्णालयांमधील महागड्या तपासण्या तसेच त्यासाठी दूरवरच्या शहरांमध्ये जाण्यापासून दिलासा मिळणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीतून अत्याधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित आणि रुग्णकेंद्री मूत्ररोग विज्ञान सेवा उपलब्ध करून देण्याप्रति नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची वचनबद्धता दिसून येते, तसेच मध्य भारतातील सर्वसमावेशक मूत्ररोग सेवांचे एक प्रमुख केंद्र म्हणून या संस्थेचे स्थानही आणखी भक्कम झाले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2290757) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English