संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कारगिल विजय दिनानिमित्त कामठी येथे आयोजित कार्यक्रमात शूर सैनिकांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण

Posted On: 27 JUL 2026 6:00PM by PIB Mumbai

नागपूर,27 जुलै 2026

27 व्या 'कारगिल विजय दिनानिमित्त '26 जुलै 2026 रोजी कामठी येथील 'गार्डस रेजिमेंट सेंटर' युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना अत्यंत गंभीर वातावरणात आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्व श्रेणीतील सैनिकांच्या वतीने देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी 'उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब-एरिया'चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल वरुण मल्होत्रा यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

या समारंभाला जवान, माजी सैनिक, 'वीर नारी' यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या गौरवशाली परंपरा, मूल्ये आणि आदर्शांचे जतन करण्याचा, तसेच अनेक पिढ्यांना ज्यांचे  शौर्य आणि बलिदान प्रेरणा देत राहील अशा अमर वीरांची आठवण जपण्याची प्रतिज्ञा करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

1999 च्या कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय सैन्य दलांच्या शूर वीरांचे अतुलनीय धैर्य, पराक्रम आणि त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जातात. लडाखमधील कारगिल-द्रास क्षेत्रात अत्यंत कठीण परिस्थितीत लढलेल्या त्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा प्रतीकात्मक दिवस मानला जातो.

'ऑपरेशन विजय' दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात आणि 16,000 फुटांपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या अतिशय दुर्गम भूप्रदेशात लढताना असीम शौर्य गाजवले. त्यांचा दुर्दम्य निश्चय, व्यावसायिकता आणि अदम्य मनोबलाच्या जोरावर शत्रूच्या फौजांना यशस्वीरीत्या हुसकावून लावण्यात आले . हा विजय भारतीय सशस्त्र दलांच्या इतिहासातील शौर्य आणि बलिदानाचे एक  उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.

या निमित्त, कामठीच्या लष्करी रुग्णालयाने एम्स , नागपूरच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच, कामठी आणि नागपूर येथील लष्करी जवानांची कुटुंबे आणि त्यांच्या मुलींसाठी 'स्तन कर्करोग तपासणी शिबिर' आणि 'एचपीव्ही लसीकरण मोहीम' राबवण्यात आली; यातून लष्करी समुदायाचे आरोग्य आणि कल्याण जपण्याबाबतची लष्कराची निरंतर कटिबद्धता स्पष्ट झाली.


निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2290039) अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein: English