राज्यसभा सचिवालय
राज्यसभेच्या नवनिर्वाचित/नामनिर्देशित खासदारांसाठी दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रम 'प्रारंभ'चे सभापतींच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2026 3:17PM by PIB Mumbai
2026 च्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यसभेवर नव्याने निवडून आलेल्या/नामनिर्देशित झालेल्या खासदारांसाठी आयोजित दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रम 'प्रारंभ'चे राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्याला राज्यसभेचे सन्माननीय उपसभापती हरिवंश, सन्माननीय खासदार, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी आणि राज्यसभा सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाची सुरुवात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. नवीन खासदार 'अमृत काळात' भारताच्या संसदेत प्रवेश करत आहेत; आणि 'विकसित भारत @2047' च्या उभारणीत ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, यावर हरिवंश यांनी भर दिला.
सरकारला उत्तरदायी ठरवण्याचा, रचनात्मक टीका करण्याचा, सरकारला योग्य मार्ग दाखवण्याचा आणि सल्ला देण्याचा खासदारांना अधिकार आहे. नवीन खासदार सरकारकडून उत्तरे मागू शकतात, जनहिताचे मुद्दे उपस्थित करू शकतात आणि विधेयकांवर सल्ला देऊ शकतात, असे हरिवंश यांनी त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात सी. पी. राधाकृष्णन यांनी नवनिर्वाचित खासदारांचे हार्दिक अभिनंदन करताना नमूद केले की 67 खासदार प्रथमच या वरिष्ठ सभागृहात आले आहेत. आपापल्या राज्यांतील सार्वजनिक व्यग्रता असूनही आठवड्याच्या उत्तरार्धात उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी खासदारांचे कौतुक केले. त्यांची ही उपस्थिती संसदीय जबाबदाऱ्या पार पाडण्याप्रति आणि लोकशाही संस्था मजबूत करण्याप्रति असलेली तीव्र कटिबद्धता दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार केल्याबद्दल सरचिटणीस आणि सचिवालयाच्या अधिकाऱ्यांचे सी. पी. राधाकृष्णन यांनी कौतुक केले. या कार्यक्रमात आयटी टूल-आधारित पहिल्या-वहिल्या कार्यशाळेसह आधुनिक डिजिटल गरजांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. 'वाणी सेतू'सारखी एआय-आधारित साधने आता राज्यसभा सभागृहात एकाच वेळी अनेक भाषांमध्ये रिअल-टाइम भाषांतर उपलब्ध करून देत आहेत, याकडे लक्ष वेधत, संसद आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भविष्यासाठी सज्ज राहण्यासाठी खासदारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) चा सक्रियपणे अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना सी. पी. राधाकृष्णन यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना या अभिमुखता कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आणि देशसेवेतील समृद्ध संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289364)
आगंतुक पटल : 17