वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
औद्योगिक कॉरिडॉर विकासाला बळकटी देण्यासाठी एनआयसीडीसीतर्फे ऑरिक स्मार्ट सिटी येथे क्रॉस-लर्निंग साईट व्हिजिटचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळाने (एनआयसीडीसी) महाराष्ट्र औद्योगिक टाउनशिप लिमिटेडच्या (एमआयटीएल) सहकार्याने 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक स्मार्ट सिटी) येथे दोन दिवसीय क्रॉस-लर्निंग साईट व्हिजिट म्हणजेच परस्परांकडून अध्ययनासाठी स्थळ भेट याचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमाने ज्ञान आदान-प्रदान सुलभ करण्यासाठी, संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासाठी आणि ग्रीनफील्ड औद्योगिक स्मार्ट शहरांच्या नियोजन, अंमलबजावणी व संचालनातील सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन करण्यासाठी देशभरातील औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांशी संबंधित राज्य सरकारे, विशेष उद्देश कंपनी (एस पी व्ही), नवीन शहरांसाठीचे कार्यक्रम व्यवस्थापक (पी एम एन सी), ईपीसी कंत्राटदार आणि इतर हितधारकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणले आहे.
सहभागींना संबोधित करताना एनआयसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रजत कुमार सैनी यांनी अधोरेखित केले की राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत (एन आय सी डी पी) एकात्मिक औद्योगिक शहर विकासासाठी ऑरिक हे एक आदर्श म्हणून उदयास आले आहे. त्यांनी यावर भर दिला की, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार-केंद्रित नियोजन, तंत्रज्ञान-सक्षम प्रशासन आणि बहुआयामी कनेक्टीव्हिटी यांचे महत्त्व हा प्रकल्पाद्वारे दर्शवले जाते. त्यांनी जमिनीचा कार्यक्षम वापर, पायाभूत सुविधांचा सर्वोत्तम उपयोग आणि भविष्यातील विस्तारासाठी विशेष उद्देश कंपन्यांना अधिक नियोजन लवचिकता देऊन सक्षम करण्याच्या महत्त्वावरही जोर दिला. सैनी यांनी नमूद केले की औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये यशस्वी अंमलबजावणी पद्धतींची पुनरावृत्ती करण्यासाठी परस्पर-शिक्षण उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सहभागींना ऑरिकच्या नियोजन पद्धतीची आणि एकात्मिक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष ओळख झाली. या भेटीमध्ये शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासावरील सादरीकरणे, डिजिटल नियोजन आणि देखरेख प्रणालींची प्रात्यक्षिके तसेच कार्यरत औद्योगिक युनिट्स आणि युटिलिटी सिस्टीम, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास स्थळे यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधांना भेटी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाने एकात्मिक मास्टर प्लॅनिंग, प्रकल्प अंमलबजावणी, भू-उपयोग, गुंतवणूकदार सुविधा, डिजिटल प्रशासन आणि प्रकल्प देखरेख या विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठही उपलब्ध करून दिले. औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमधील समन्वय मजबूत करणे आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे यावर सहभागींनी अनुभवांची देवाणघेवाण केली.
ऑरिकचे एकात्मिक नियोजन, उपयुक्तता पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि गुंतवणूकदार सुविधा यंत्रणांमधून मिळालेला अनुभव 'भव्य' योजनेअंतर्गत औद्योगिक पार्कच्या अंमलबजावणीस कसा सहाय्य करू शकेल, यावर सहभागींनी विचारमंथन केले. या योजनेअंतर्गत अर्जांच्या पहिल्या फेरीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी राज्ये आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे.
गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, व्यवसाय सुलभता अधिक सुधारण्यासाठी आणि भारताची उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यासाठी प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा, एकात्मिक उपयुक्तता नेटवर्क, तंत्रज्ञान-सक्षम शहरी व्यवस्थापन आणि बहूआयामी कनेक्टीव्हिटी यांच्या भूमिकेवर या चर्चांमध्ये प्रकाश टाकण्यात आला. सहभागींनी शाश्वत पायाभूत सुविधा, डिजिटल भू-व्यवस्थापन प्रणाली, गुंतवणूकदार-स्नेही मंजुरी यंत्रणा आणि भविष्यासाठी सज्ज औद्योगिक परिसंस्था, अशा अनेक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली ज्याचा इतर औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये स्वीकार केला जाऊ शकतो.
हा कार्यक्रम 24 जुलै 2026 पर्यंत सुरु राहील.यामध्ये प्रकल्प अंमलबजावणी, पायाभूत सुविधा विकास, आव्हाने आणि सर्वोत्तम पद्धती यांवरील तांत्रिक सादरीकरणांसह सुरू राहील. त्यानंतर सहभागी राज्ये आणि प्रकल्पाच्या हितधारकांमध्ये एक परस्परसंवादी आंतर-शिक्षण सत्र होईल.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288634)
आगंतुक पटल : 10