शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी परिषद आणि आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाच्या बैठकीचे केले आयोजन, ब्रिक्स उच्च शिक्षण सहकार्याला बळकटी

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2026 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2026

 

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी, 20 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या पारंपरिक आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींवरील ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी परिषदेनंतर मंगळवारी 21 जुलै 2026 रोजी ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे यशस्वीरीत्या आयोजित केली. उच्च शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषामधले सहकार्य मजबूत करण्यासाठी या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्रिक्स सदस्य देशांचे सरकारी प्रतिनिधी, विद्यापीठांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञ एकत्र आले.

ब्राझील, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यांसह ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी, तसेच विद्यापीठांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांनी राष्ट्रीय उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धती दर्शवणारी सादरीकरणे केली. या चर्चेत वाढीव शैक्षणिक सहकार्य, सहयोगी संशोधन, संस्थात्मक भागीदारी आणि ज्ञानाची देवाणघेवाण याद्वारे ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी बळकट करण्याच्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.

पारंपरिक आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींवरील ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी परिषदेच्या निष्कर्षांचे सादरीकरण हे या बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. ही ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीच्या चौकटीअंतर्गत अशा प्रकारची पहिलीच परिषद होती. आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाच्या विचारार्थ या परिषदेने पारंपरिक आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींवरील शैक्षणिक सहकार्य बळकट करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा विकसित केली आहेत.

सहकार्याच्या या उदयोन्मुख क्षेत्राचे महत्त्व ओळखून, आंतरराष्ट्रीय नियामक मंडळाने पारंपरिक आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींना ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी अंतर्गत नवीन आंतरराष्ट्रीय संकल्पना गट म्हणून समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावाला सदस्य देशांकडून व्यापक पाठिंबा मिळाला आणि हा प्रस्ताव ब्रिक्स उच्च शिक्षण चौकटीमध्ये पारंपरिक ज्ञानावरील सहकार्याला संस्थात्मक रूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

भारताने सर्व सहभागी प्रतिनिधींचे त्यांच्या रचनात्मक सहभागाबद्दल आभार मानले आणि "लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी" या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या संकल्पनेअंतर्गत शैक्षणिक सहकार्य पुढे नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2288026) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी