सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'स्माईल' योजनेंतर्गत सर्वसमावेशक पुनर्वसनाच्या माध्यमातून 'भिक्षेकरी-मुक्त भारत' घडवण्याच्या देशाच्या कटिबद्धतेला बळकटी


देशभरातील 216 शहरांमध्ये 'स्माईल' भिक्षेकरी निर्मूलन योजनेची अंमलबजावणी सुरू; योजनेअंतर्गत 10,200 हून अधिक व्यक्तींचे पुनर्वसन

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2026 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,20 जुलै 2026

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने 'स्माईल' (SMILE - वंचितवर्गातील व्यक्तींना उदरनिर्वाह आणि व्यवसायासाठी पाठबळ अर्थात सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाइव्हलीहुड अँड एंटरप्राइज) ही योजना राबवण्यात येत आहे. दुर्बल वर्गातील समुदायांचे सन्मानपूर्वक सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करणे आणि त्यांना उपजीविकेसाठी शाश्वत संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या व्यापक योजनेमध्ये 'भीक मागणाऱ्या व्यक्तींच्या समावेशक पुनर्वसनासाठीची केंद्रीय क्षेत्रातील योजने'चाही समावेश असून पुनर्वसन, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, समुपदेशन आणि आर्थिक सक्षमीकरणाद्वारे संबंधित व्यक्तींचे जीवन बदलणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

'स्माईल' भिक्षावृत्ती निर्मूलन योजना सध्या संपूर्ण देशभरात 216 शहरांमध्ये राबवण्यात येत असून, 2030-31 या आर्थिक वर्षापर्यंतच्या पुढील पाच वर्षात एकूण 295 शहरांमध्ये तिची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य असल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 2026-31 या आर्थिक वर्षासाठी 'स्थायी वित्त समिती'ने (एसएफसी) मंजूर केलेल्या तरतुदींनुसार, ही योजना राबवण्याकरिता विशेषतः महानगरे तसेच धार्मिक, पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांना केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेअंतर्गत 35000 व्यक्तींचे पुनर्वसन करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून, आतापर्यंत 10, 200 हून अधिक भिक्षेकरी व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित उद्दिष्ट मंजूर अंमलबजावणी आराखड्यानुसार 2030-31 या आर्थिक वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा प्रशासन, शहरी स्थानिक संस्था, महानगरपालिका आणि अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्या समन्वित प्रयत्नांतून 'भिक्षावृत्ती-मुक्त भारत' हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकमेव अंतिम ध्येयावर आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करून, भिक्षेकरी व्यक्तींची ओळख पटवणे, त्यांची त्यातून मुक्तता करणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना सन्मानाने व आत्मविश्वासाने पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होण्याची या योजनेच्या रुपाने सोय करण्यात आली आहे.

शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2286803) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada