आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या राष्ट्रीय आढावा बैठकीत (चिंतन शिबिर)केंद्र आणि राज्यांनी केली 'आयुष्मान भारत पीएम-जेएवाय'आणि 'एबीडीएमच्या'च्या पुढील टप्प्याच्या कृती आराखड्याची आखणी


“एबी पीएम-जेएवायच्या माध्यमातून लाभार्थींना 1.91 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कॅशलेस उपचार उपलब्ध; एबीडीएमने 94 कोटींहून अधिक एबीएचए क्रमांक तयार करून त्यांच्याशी 100 कोटींहून अधिक आरोग्य नोंदी केल्या संलग्न” – प्रतापराव जाधव

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2026 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 जुलै 2026

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील 'राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) वतीने नवी दिल्लीतील मध्य प्रदेश भवनात आयोजित केलेल्या 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (एबी पीएम-जेएवाय) आणि 'आयुष्मान भारत डिजिटल मिशन' (एबीडीएम) यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील दोन दिवसीय राष्ट्रीय आढावा बैठकीला (चिंतन शिबिर) आज सुरुवात झाली. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या राष्ट्रीय आढावा बैठकीचे उद्घाटन केले.

"एबी पीएम-जेएवायमुळे देशभरातील 37,000 हून अधिक सूचीबद्ध रुग्णालयांच्या जाळ्याच्या माध्यमातून 1.91 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे रोख-रहित (कॅशलेस) उपचार उपलब्ध करून दिले गेले असल्याने ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरली आहे," असे प्रतापराव जाधव यांनी गेल्या सात वर्षांत या योजनेला आलेले यश अधोरेखित करताना सांगितले.

डिजिटल आरोग्य क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकताना जाधव म्हणाले की, "आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे (एबीडीएम) भविष्यासाठी सज्ज असलेल्या आरोग्य सेवा प्रणालीची डिजिटल पायाभरणी झाली आहे; याअंतर्गत 94 कोटींहून अधिक एबीएचए क्रमांक तयार करण्यात आले असून 100 कोटींहून अधिक आरोग्यविषयक नोंदी त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी यावर भर दिला की, एबीडीएम 2.0 च्या यशाचे मूल्यमापन केवळ डिजिटल नोंदींच्या संख्येवरून नव्हे; तर विविध राज्यांमध्ये विनासायास आरोग्य नोंदी उपलब्ध होण्याची तसेच जवळपास असलेल्या आरोग्य सुविधांचा सुलभपणे शोध घेण्याची झालेली सोय आणि त्याला एबी पीएम-जेएवायची भक्कम जोड असल्याने दैनंदिन जीवनात केवढा बदल झाला आहे यावरून करणे गरजेचे असून आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याची 'डिजिटल इंडिया'ची क्षमताही यातून दिसून येत आहे."

एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम यांची मोठ्या प्रमाणात सांगड घालण्याची गरज व्यक्त करत जाधव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी यापुढेही सर्व आरोग्यसेवा उपक्रमांमध्ये अत्यंत गरीब आणि सर्वाधिक दुर्बल गटातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यासोबतच, अंमलबजावणीतील समन्वय अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सामूहिक प्रयत्नांवर विश्वास व्यक्त करत, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सुलभता, उत्तरदायित्व आणि सहृदयता या मूलभूत तत्त्वांवर आधारलेली, भविष्यासाठी सिद्ध, नागरिक-केंद्रित आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम आरोग्यसेवा प्रणाली उभी करून 'विकसित भारत @2047' च्या संकल्पनेत लक्षणीय योगदान देता येऊ शकेल, असे ते म्हणाले.

एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम अंतर्गत आरोग्य वित्तपुरवठा, कार्यक्रमाची अंमलबजावणी, डिजिटल आरोग्याचा अवलंब, डेटा ॲनालिटिक्स, नवोन्मेष आणि सर्वोत्तम कार्यपद्धती यांवर 18 जुलै 2026 रोजीही 'चिंतन शिबिरात' चर्चा सुरू राहील.

शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

   सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2285988) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Tamil