नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी 'सुधारित उडान' योजनेवरील संबंधित भागधारकांच्या कार्यशाळेचे केले उद्घाटन
राममोहन नायडू यांनी विज्ञान भवन येथे विमान वाहतूक क्षेत्रासाठी 'सुधारित उडान' योजनेची मार्गदर्शक तत्त्वे केली सादर
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2026 5:43PM by PIB Mumbai
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'उडान योजनेचा पुढील टप्पा' या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. देशातील प्रादेशिक विमान प्रवासाच्या भविष्यातील आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख भागधारक यात एकत्र आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जुलै 2026 रोजी जोधपूर विमानतळावरून 'सुधारित उडान' या योजनेचा शुभारंभ केला होता.
या कार्यशाळेचे उद्घाटन, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी केले. यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात 'उडान' योजनेवरील डिजिटल प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. या प्रदर्शनातून देशातील प्रादेशिक विमान वाहतुकीला चालना देण्यात या योजनेने मिळवलेले यश आणि घडवलेला मोठा बदल सादर करण्यात आला. उद्घाटन सत्रादरम्यान 'उडान च्या यशावर आधारित एक लघुपटही दाखवण्यात आला.
बीजभाषणात राममोहन नायडू किंजरापू यांनी 'उडान' योजनेच्या पुढील टप्प्याची माहिती दिली. प्रादेशिक हवाई संपर्क अधिक वाढवणे, देशातील सर्व भागांचा समतोल विकास साधणे आणि विमान प्रवासाचे लाभ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे, ही सरकारची दूरदृष्टी त्यांनी स्पष्ट केली.
आपल्या भाषणात राममोहन नायडू म्हणाले, "2001 मध्ये भारतात 65 विमानतळ होते. 2014 पर्यंत ही संख्या वाढून 74 झाली – म्हणजेच 13 वर्षांत केवळ 9 विमानतळांची भर पडली आणि गेल्या 12 वर्षांत आम्ही 90 नवीन विमानतळांची भर घातली आहे! 9 वरून थेट 90! निरुपयोगी आणि सेवेत नसलेल्या 55 धावपट्ट्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे कार्यरत विमानतळांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे! भारत ही जगातील 3 री सर्वात मोठी देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठ बनण्यामागे पंतप्रधानांची दूरदृष्टीपूर्ण 'उडान' संकल्पनाच कारणीभूत आहे! 10 वर्षांपूर्वी विमान वाहतूक, मुख्यत्वे पहिल्या सहा मोठ्या विमानतळांवरच केंद्रित होती. त्यामुळे श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरे या सुविधेपासून वंचित किंवा दुर्लक्षित राहिली होती. परंतु, त्यानंतर पंतप्रधानांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या 'राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरण 2016' मुळे आपल्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे चित्र पूर्णपणे बदलून गेले."
'उडान' योजनेच्या परिणामांविषयी बोलताना मंत्री म्हणाले, "पंतप्रधानांच्या परिवर्तनकारक नेतृत्वामुळे देशात विमान वाहतुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता सामान्य नागरिकांच्या मनातील विमान प्रवासाविषयीची मानसिकता बदलली आहे."
माननीय अतिथी म्हणून बोलताना नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशातील नागरिकांसाठी, विशेषतः श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरे आणि दुर्गम भागातील लोकांसाठी विमान प्रवास स्वस्त आणि सुलभ बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
***
निलिमा चितळे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285477)
आगंतुक पटल : 13