वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई महानगर क्षेत्रातील तीन ठिकाणाहून भारत-यूके सीईटीए निर्यात शिपमेंटची औपचारिकपणे रवानगी


भारत-यूके सीईटीए मुळे द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार, बाजारपेठेतील प्रवेश सुधारणार आणि भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण होणार

भारत डायमंड बोर्स, जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस आणि सिप्झ-सेझ येथून निर्यात मालाची पाठवणी

Posted On: 15 JUL 2026 6:41PM by PIB Mumbai

मुंबई,15 जुलै 2026

भारत-युनायटेड किंगडम सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराचे (सीईटीए) फायदे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, आज मुंबई महानगर क्षेत्रातील तीन ठिकाणांवरून युनायटेड किंगडमसाठीच्या निर्यात मालाच्या खेपा औपचारिकपणे रवाना करण्यात आल्या. वांद्रे-कुर्ला संकुलामधील 'भारत डायमंड बोर्स', न्हावा शेवा आणि 'सीप्झ-एसईझेड' येथे हिरवा झेंडा दाखवून या महत्त्वपूर्ण व्यापार करारांतर्गत निर्यात मालाच्या वाहतुकीची सुरुवात करण्यात आली. भारत-यूके सीईटीए  द्वारे द्विपक्षीय व्यापार मजबूत होईल, युनायटेड किंगडममध्ये भारतीय उत्पादनांसाठी बाजारपेठेतील प्रवेश सुधारेल आणि भारतीय उद्योगांसाठी  निर्यातीच्या संधी वाढतील. भारत-यूके सीईटीए मुळे भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होईल, द्विपक्षीय व्यापार वाढीला चालना मिळेल आणि विविध क्षेत्रांमध्ये भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण होतील, यामधून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व्यापारी राष्ट्र बनण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला हातभार लागेल.

भारत डायमंड बोर्स येथे आयोजित भारत-यूके सीईटीए शुभारंभ समारंभाला उप-डीजीएफटी विश्वजीत चिमणकर, सीमाशुल्क आयुक्त संतोषकुमार मिश्रा आणि सीमाशुल्क सह-आयुक्त किरण कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात निर्यातदारांचाही सहभाग होता.

भारत डायमंड बोर्स, बीकेसी येथील औपचारिक समारंभ

या सोहळ्यामुळे भारत-यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारांतर्गत (सीईटीए) निर्यात मालवाहतुकीची सुरुवात झाली. या करारामुळे द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन मिळेल, युनायटेड किंगडममध्ये भारतीय उत्पादनांसाठी बाजारपेठ प्रवेश सुलभ होईल आणि भारतीय उद्योगांसाठी निर्यातीच्या संधी वाढतील. रत्ने आणि दागिने, वस्त्रोद्योग, चामडे, सागरी उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, पादत्राणे आणि एमएसएमईसह अनेक क्षेत्रांना या करारातील सवलत शुल्क तरतुदींचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

न्हावा शेवा येथील भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर कार्गो बंदरावर, डीजीएफटी प्रादेशिक प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने 'भारत-यूके सीईटीए' उपक्रमाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विमल कुमार श्रीवास्तव, मुख्य आयुक्त, सीमाशुल्क, मुंबई विभाग II, गिरीधर पै, सीमाशुल्क आयुक्त, मुंबई विभाग II, बी.एन. बिस्वास, संयुक्त डीजीएफटी; रमेश होल्याची, संयुक्त डीजीएफटी; बकियावेलू मुथारासू, उपमहासंचालक, यांच्यासह डीजीएफटी आणि सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निर्यात समुदायाचे प्रतिनिधी, सीमाशुल्क ब्रोकर्स, लॉजिस्टिक भागधारक आणि व्यापार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

न्हावा शेवा (जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस) येथील औपचारिक समारंभ

या समारंभादरम्यान, रसायने, औषधनिर्माण, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले यासारख्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात निर्यातदारांच्या मालाच्या खेपांची रवानगी करण्यात आली, याद्वारे भारत-यूके सीईटीए अंतर्गत न्हावा शेवा बंदरातून निर्यातीची औपचारिकपणे सुरुवात झाली.

सिप्झ-सेझ (SEEPZ-SEZ) मधील 'मेगा कॉमन फॅसिलिटी सेंटर' येथे युनायटेड किंगडम येथे निर्यात होणाऱ्या मालाच्या खेपांना हिरवा झेंडा दाखवून 'भारत-यूके सीईटीए'चा शुभारंभ करण्यात आला. सिप्झ-सेझचे विकास आयुक्त ज्ञानेश्वर बी. पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आदिल कोतवाल, अध्यक्ष, एसजीजेएमए, विजय गुजराती, अध्यक्ष, सीमा (SEEMA) कॉलिन शाह, माजी अध्यक्ष आणि मेगा सीएफसी कार्यकारी समिती सदस्य, भरत घोरी जीजेईपीसी आणि डायमंड पॅनेल समितीचे सीओए सदस्य, यांच्यासह सिप्झचे अधिकारी आणि व्यापारी भागधारक उपस्थित होते.

सिप्झ-सेझ (SEEPZ-SEZ)येथील औपचारिक समारंभ

सिप्झ-सेझ येथे भारत-यूके सीईटीए बाबत झालेल्या सादरीकरणात या महत्त्वपूर्ण कराराचे महत्त्व आणि त्याद्वारे भारतीय निर्यातदारांना प्रमुख निर्यात क्षेत्रांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला. सिप्झ (SEEPZ) मधून युकेला होणाऱ्या निर्यातीत 2,109 कोटी रुपयांहून अधिक योगदान देणाऱ्या रत्न आणि दागिने क्षेत्राला, युकेने आजपासून 4 टक्के आयात शुल्क माफी दिल्यामुळे सुमारे 84 कोटी रुपयांचा वार्षिक शुल्क-विषयक लाभ त्वरित मिळण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे आगामी काळात किमतीतील स्पर्धात्मकता वाढेल, निर्यातदारांच्या नफ्यात सुधारणा होईल, जास्त गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्मिती होईल आणि सिप्झ-सेझ मधून युनायटेड किंगडममध्ये होणार्‍या निर्यातीला लक्षणीय चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

या समारंभाने निर्यातदारांमध्ये मूळ नियमांचे पालन, दस्तऐवजीकरण आवश्यकता आणि इतर संबंधित निर्यात प्रक्रियांसह करारांतर्गत फायदे मिळविण्यासाठी प्रक्रियात्मक आवश्यकतांबाबत जागरूकता निर्माण करण्याची संधी दिली.

 

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2285054) अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein: English