सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'तृतीयपंथीयांची ओळख आणि समस्यांविषयी जागरूकता' या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2026 8:29PM by PIB Mumbai

 

पुणे, 12 जुलै 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘नॅशनल सेमिनार ऑन अवेअरनेस ऑफ ट्रान्सजेंडर आयडेंटिटी अँड इश्यूज' (तृतीयपंथीयांची ओळख आणि समस्यांविषयी जागरूकता यावरील राष्ट्रीय चर्चासत्र) या कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या समारोप सत्राला भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण केंद्रीय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांनी संबोधित केले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क, प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. तृतीयपंथीय समुदायाला समान संधी, सामाजिक स्वीकृती मिळवून देण्यासाठी आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मोदी सरकार तृतीयपंथीय व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आमचे सरकार प्रत्येक वंचित व शोषित घटकाच्या उत्थानासाठी काम करत असून, तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण हा आमच्या राष्ट्रीय अजेंड्याचा एक मुख्य भाग आहे," असे श्री. रामदास आठवले म्हणाले.

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांवर प्रकाश टाकला. यामध्ये प्रामुख्याने ‘स्माईल' (SMILE - Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise) योजनेचा उल्लेख त्यांनी केला. या योजनेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सेवा, उपजीविका, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षा पुरवून तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि देशाच्या विकासात सहभागी करून घेण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र विभाग, शिक्षण आणि विस्तार विभाग (DEE) आणि जेंडर स्टडीज (लिंगभाव अभ्यास) विभाग यांच्या वतीने, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

11 आणि 12 जुलै 2026 दरम्यान पार पडलेल्या या चर्चासत्राने तृतीयपंथीयांची ओळख, सामाजिक समावेश, शिक्षण, कायदेशीर हक्क, आरोग्य सेवा, उपजीविकेच्या संधी आणि धोरणात्मक निर्णय यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथनासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या दोन दिवसीय कार्यक्रमातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये प्राध्यापक, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समुदायाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला.
या प्रसंगी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रो. (डॉ.) पराग काळकर यांच्यासह विद्यापीठाचे इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

***

हर्षल अकुडे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2283946) आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English