संरक्षण मंत्रालय
हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थिरतेचा मुख्य हमीदार म्हणून भारत उभा आहे: सागरी हितसंबंधांचे रक्षण करत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांकडून भारतीय नौदलाची प्रशंसा
“भविष्यातील संघर्ष अनपेक्षित स्वरूपात उद्भवू शकतात; सैनिकांनी सज्ज राहिले पाहिजे”
Posted On:
10 JUL 2026 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2026
“हिंदी महासागर क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेचा भारत हा प्रमुख हमीदार आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. वाढत्या गुंतागुंतीच्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत देशाच्या सागरी हितांचे रक्षण करत असल्याबद्दल आणि तिरंगा ध्वजाची शान वाढवल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदलाची प्रशंसा केली. ते 10 जुलै, 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात ‘महेंद्रगिरी’ या सहाव्या प्रोजेक्ट 17ए स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेटच्या समावेशाच्या पूर्वसंध्येला आयोजित मेजवानीप्रसंगी नौदल कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.

हिंदी महासागर क्षेत्राचे सामरिक महत्त्व अधोरेखित करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, भारताचा 90 टक्क्यांहून अधिक व्यापार सागरी मार्गांनी होतो तर देशाची ऊर्जा सुरक्षा, विशेष आर्थिक क्षेत्र आणि द्वीपसमूह यांमुळे सागरी सुरक्षा ही देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी केंद्रस्थानी राहिली आहे. त्यांनी यावर जोर दिला की वाढती भू-राजकीय स्पर्धा आणि बाह्य-प्रादेशिक शक्तींच्या वाढत्या उपस्थितीमुळे वाढीव सागरी दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे. “अशा परिस्थितीत, भारतीय नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करत आहे, महत्त्वाचे सागरी मार्ग सुरक्षित करत आहे आणि संपूर्ण प्रदेशात देशाच्या हितांचे रक्षण करत आहे,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी आत्मनिर्भरता मिळवण्याच्या दिशेने होत असलेली प्रगती स्पष्ट केली आणि महेंद्रगिरीचा समावेश हे भारताच्या वाढत्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे आणखी एक देदीप्यमान उदाहरण असल्याचे म्हटले. धोके आणि आव्हानांपासून राष्ट्राचे रक्षण केल्याचे श्रेय त्यांनी संरक्षण दलांच्या शौर्य, वचनबद्धता आणि देशभक्तीला दिले, तसेच सैनिकांना आपली कौशल्ये सतत अद्ययावत करत राहण्याचे, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याचे आणि आधुनिक युद्धाच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याचे अधोरेखित करत राजनाथ सिंह म्हणाले की भविष्यातील संघर्ष नवीन आणि अनपेक्षित स्वरूपात उद्भवू शकतात. त्यांनी सैनिकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे, आपली कौशल्ये सतत अद्ययावत करण्याचे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याचे आवाहन केले. सैनिकांना जगातील सर्वोत्तम शस्त्रे, तंत्रज्ञान आणि संसाधने पुरवण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. पण केवळ शस्त्रांनी युद्ध जिंकले जात नाही; ती चालवणारे लोक युद्ध जिंकतात,” असेही ते म्हणाले.
नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन, पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला आणि नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2283519)
अभ्यागत कक्ष : 59