नौवहन मंत्रालय
18 मीटर ड्राफ्ट क्षमता प्राप्त करणारे कामराजार बंदर ठरले भारतातील दुसरे प्रमुख बंदर; त्यामुळे भारताच्या सागरी स्पर्धात्मकतेत होणार लक्षणीय वाढ
Posted On:
07 JUL 2026 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,7 जुलै 2026
कामराजार पोर्ट लिमिटेड (केपीएल) ने 'कॅपिटल ड्रेजिंग फेज VI' प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून,मोठ्या 'केपसाईज' (अवाढव्य मालवाहू जहाजे) जहाजांची हाताळणी करण्यास सक्षम असलेल्या पाण्याची मोठी खोली असलेल्या (डीप-वॉटर) बंदरांमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.आता 18 मीटरच्या कार्यान्वित ड्राफ्ट क्षमतेमुळे हे बंदर 1,70,000 डीडब्ल्यूटी पर्यंतची मालवाहू जहाजे सामावून घेऊ शकते. या कामगिरीसह, कामराजार बंदर हे विशाखापट्टणम बंदरानंतर 18 मीटरचा ड्राफ्ट उपलब्ध करून देणारे देशातील दुसरे मोठे बंदर बनले आहे.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारताचे सागरी क्षेत्र ऐतिहासिक परिवर्तनातून जात आहे. 18 मीटर ड्राफ्ट (पाण्याची खोली) क्षमता प्राप्त करून कामराजार बंदर देशातील दुसरे प्रमुख खोल पाण्याचे बंदर बनणे, हा आधुनिक, जागतिक दर्जाच्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन उभारल्या जाणाऱ्या सागरी पायाभूत सुविधांच्या दिशेने गाठलेला आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या यशामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच जागतिक सागरी व्यापारातील देशाची स्पर्धात्मकताही अधिक बळकट होणार आहे."
सोनोवाल पुढे म्हणाले,'कॅपिटल ड्रेजिंग फेज VI'च्या यशस्वी पूर्ततेने कामराजार बंदराचे रुपांतर अधिक खोलीच्या,'केप कंप्लायंट' बंदरात केले आहे. त्यामुळे ते 1,70,000 डीडब्ल्यूटी पर्यंतची पूर्ण भरलेली केपसाईज जहाजे हाताळण्यास सक्षम बनले आहे. ही कामगिरी, माल हाताळणीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढवेल, मालपुरवठा व्यवस्थापनावरील खर्च कमी करेल, व्यापार सुलभतेला चालना देईल आणि भारताच्या आयात-निर्यात (एक्झिम) व्यापारासाठी प्रमुख प्रवेशद्वार म्हणून कामराजार बंदराची भूमिका अधिक बळकट करेल."
पाण्याची खोली वाढल्यामुळे शिपिंग कंपन्यांना अधिक मोठी जहाजे तैनात करता येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील बचतीचा फायदा मिळून वाहतूक खर्चात घट होईल, परिचालन कार्यक्षमता वाढेल आणि माल हाताळणीची क्षमता लक्षणीयरीत्या सुधारेल. यामुळे या क्षेत्रातील व्यापाराला मोठा आर्थिक लाभ होईल, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बंदरांच्या तुलनेत कामराजार बंदराची स्पर्धात्मकता अधिक बळकट होईल आणि भारताच्या वाढत्या आयात-निर्यात व्यापाराच्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यास मदत मिळेल. या 'केप कंप्लायंट' खोलीमुळे कामराजार बंदर आता मोठ्या प्रमाणात माल (बल्क कार्गो) हाताळणीत आंतरराष्ट्रीय बंदरांच्या पंक्तीत सामील झाले आहे.
सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2282285)
अभ्यागत कक्ष : 61