पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंती समारंभात केले मार्गदर्शन


आपण भारत मातेच्या अशा सुपुत्राला अभिवादन करत आहोत, ज्यांची राष्ट्रीय एकात्मतेप्रतीची दृढ कटिबद्धता, येत्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील - पंतप्रधान

जेव्हा देशात “राष्ट्र प्रथम” या भावनेने काम करणारे सरकार असते, त्यावेळी देशाच्या नायकांनाही सन्मान दिला जातो - पंतप्रधान

डॉ. मुखर्जी यांनी देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान आणि दोन निशाण असण्याच्या चर्चेलाही कडाडून विरोध केला होता – पंतप्रधान

देशबांधणीचे मर्म, देशातल्या संस्थांच्या उभारणीत आहे, हे मुखर्जी यांनी अचूकपणे ओळखले होते - पंतप्रधान

डॉ. मुखर्जी यांनी अशा राष्ट्रीय संस्थांचा पाया रचला, ज्या पुढच्या कित्येक दशकांत भारताची ताकद म्हणून उभ्या राहिल्या - नरेंद्र मोदी

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,6 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, असे सांगत, त्यांनी अशा संस्मरणीय प्रसंगात, भौगोलिक सीमा ओलांडून एकमेकांच्या जवळ नेण्याची, डिजिटल संपर्कव्यवस्थेची ताकद अधोरेखित केली. “तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी आज या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या दिवसाचे संपूर्ण राष्ट्रासाठी आणि विशेषतः पश्चिम बंगालसाठी असलेले ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांसह देशाच्या या महान सुपुत्राला भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता जपण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले,अशा या निष्ठावान राष्ट्रभक्ताचे त्यांनी आपल्या भाषणातून स्मरण केले. "आज संपूर्ण भारत भूमी, देशाच्या अखंडतेसाठी आपले जीवन वाहिलेल्या एका दूरदर्शी राष्ट्रनेत्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे," असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

या आदरणीय नेत्याच्या चिरंतन वारशाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की अनेक दशकांपूर्वी त्यांनी पेरलेला विचारांचा वारसा, आज समाज आणि राजकारणाच्या विविध क्षेत्रांत स्पष्टपणे बहरताना दिसत आहेत. आधुनिक भारताच्या प्रगतीला योग्य दिशा देण्यात या भक्कम वैचारिक पायाभरणीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. “आधुनिक भारताला दिशा देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या विचारांच्या बीजांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत,” असे मोदी यावेळी म्हणाले.

देशाच्या प्रगतीसाठी, महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आवश्यक गोष्टी काय असतात, हे सांगतांना ते म्हणाले की दृढ वैचारिक ताकद, प्रामाणिक हेतू आणि संपूर्ण समर्पण यांचा प्रभावी संगम घडला, तर कोणतेही राष्ट्रीय ध्येय साध्य करणे शक्य होते. आणि या यशस्वी सूत्राचे सर्वोत्तम मूर्तिमंत उदाहरण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी या दूरदर्शी नेत्याचे जीवन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "जेव्हा हे सर्व गुणविशेष परस्परांशी जोडले जातात, तेव्हा संकल्पपूर्ती निश्चित होते," असे पंतप्रधान म्हणाले.  

देशाच्या इतिहासामध्‍ये आपल्‍या अ‍भूतपूर्व कार्याने अमिट ठसा उमटविणाऱ्या नेत्याच्या 125 व्या जयंतीनिमित्त, त्यांनी अत्यंत आदराने आपली वैयक्तिक आदरांजली अर्पण केली. या महान देशभक्ताचा भव्य वारसा आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी त्यांनी आपल्या भाषणात काही काळ थांबून त्यांना अभिवादन केले. "या प्रसंगी मी डॉ.मुखर्जी यांना नमन करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सध्याच्या सरकारची 'राष्ट्र प्रथम' ही भावना आणि इतिहासामध्‍ये अजोड कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना मिळणारा योग्य सन्मान यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी आजच्या या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित दोन वर्षांच्या राष्ट्रीय महोत्सवाची माहिती दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेला हा दीर्घकालीन उत्सव म्हणजे त्या दूरदर्शी नेत्याच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा एक संयुक्त आणि  दीर्घकालीन प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. "ज्यावेळी  'राष्ट्र प्रथम'चा संकल्प असलेले सरकार असते, त्याचवेळी राष्ट्रीय नायकांनाही योग्य सन्मान मिळतो," असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

पश्चिम बंगालमध्ये नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने या राष्ट्रीय उत्सवांची भव्यता कशा प्रकारे वाढवली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सरकारने अलिकडेच आयोजित केलेल्या 'पश्चिम बंगाल दिवस'च्या भव्य आयोजनाचे त्यांनी विशेष कौतुक केले. हा कार्यक्रम म्हणजे या प्रदेशाच्या समृद्ध वारशाला दिलेली एक सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानवंदना होती."आजचा कार्यक्रमही आपल्या वारशाविषयी असलेल्या त्याच आदराचा एक भाग आहे," असे पंतप्रधान म्हणाले.

महत्त्वाच्या ऐतिहासिक संसदीय नोंदींचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी 1947 मधील एका गंभीर संकटाची आठवण करून दिली.  त्या आपत्तीमध्‍ये  कट-कारस्थानांमुळे संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यालाच देशाला मुकावे लागेल, अशी भीती निर्माण झाली होती. भारताबरोबर राज्याचे कायमस्वरूपी विलीनीकरण निश्चितपणे केले जावे, यासाठी या महान नेत्याने खंबीर राजकीय भूमिका घेतली आणि जनमत तयार करण्‍यासाठी त्यांनी अत्यंत कुशलतेने कार्य केले, याबद्दल पंतप्रधानांनी डॉ.मुखर्जी यांची प्रशंसा केली. "डॉ.मुखर्जी यांचे एक गाजलेले उध्‍दरण आहे, ते म्हणजे, देशाच्या सुवर्णमयी भविष्याचा पाया केवळ राष्ट्रीय एकात्मतेच्या भूमीवरच रचला जाऊ शकतो," याचे स्मरण नरेंद्र मोदी यांनी करून दिले.

या ऐतिहासिक संघर्षाची सांगड आजच्या भू-राजकीय आव्हानांशी घालताना पंतप्रधान मोदी यांनी अशा प्रचंड राजकीय इच्छाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. भूतकाळातील त्या परिस्थितीचे चिंतन केले तर आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण वैचारिक बळ मिळते, यावर त्यांनी भर दिला. "आजच्या परिस्थितीकडे पाहताना, त्या काळातील त्या बुलंद आवाजाची प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आम्हाला आजही जाणवते," असे नरेंद्र मोदी म्हणाले.

संपूर्ण राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिलेल्या लढ्याचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी देशाच्या सीमांतर्गत दुहेरी प्रशासकीय आणि प्रतीकात्मक व्यवस्था कायम ठेवण्याविरुद्ध झालेल्या तीव्र ऐतिहासिक विरोधाची सविस्तर माहिती दिली. प्रशासन आणि राष्ट्रीय ओळख यामध्ये कमालीची एकसमानता असलीच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या त्या प्रभावी घोषणेची त्यांनी आठवण करून दिली. "डॉ. मुखर्जी यांनी  देशात दोन राज्यघटना, दोन पंतप्रधान आणि दोन ध्वज असण्याच्या कल्पनेला तीव्र विरोध केला होता," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

या संघर्षाकडे केवळ राजकीय घोषणा म्हणून न पाहता समान हक्कांसाठी दिलेली हाक म्हणून पाहिले पाहिजे असे सांगत, त्यांनी या एकीकरणाच्या उद्देशासाठी काश्मीरमधील सर्वोच्च बलिदानाची कृतज्ञतापूर्वक दखल घेतली. कलम 370 चे अडथळे कायमचे दूर करून सरकारने या वारशाचा सन्मान केला, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. "ती भिंत पाडून आम्ही डॉ. मुखर्जींचे स्वप्न पूर्ण केले आहे, याचा आज आमच्या सरकारला सार्थ अभिमान आहे," असे प्रतिपादन मोदींनी केले.

अखंड राष्ट्राच्या संकल्पनेचा विस्तार विषद करताना, त्यांनी  प्रादेशिक भेदभावापासून मुक्त समाज,जिथे पूर्वेकडून ते पश्चिमेपर्यंत समान संधी उपलब्ध आहेत. राज्ये आपल्या स्वतंत्र ओळखीसह  सामायिक भवितव्याखाली राष्ट्राची सामुहिक शक्ती बनतील, अशा शब्दात त्यांनी हे वर्णन केले. "त्यांनी आपल्या आयुष्यातून साकारलेल्या  त्याच राष्ट्रीय दृष्टिकोनाचा हा विस्तार आहे," असे मोदींनी सांगितले.

सर्वत्र समान कायदेशीर व्यवस्था प्रत्यक्षात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की ही एकात्मिक प्रशासन पद्धतीतून मिळणारी व्यापक प्रेरणा आहे. देशाच्या मूळ संविधानाची अंमलबजावणी कोणत्याही अपवादाशिवाय होत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

शिक्षणाच्या क्षेत्राविषयी बोलताना, पंतप्रधानांनी त्या दूरदर्शी नेत्याच्या सुरुवातीच्या काळातील, विशेषतः कलकत्ता विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू या पदावर असतानाच्या  प्रशासकीय कर्तृत्वाचा उल्लेख केला. वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होऊन, शैक्षणिक परिसरांचे रूपांतर राष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या केंद्रांमध्ये करण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. "राष्ट्रनिर्मितीचा गाभा हा संस्थांच्या उभारणीतच असतो, हे त्यांनी जाणले  होते," असे मोदी यांनी नमूद केले.

प्रादेशिक भाषांमधील शिक्षणाद्वारे प्रादेशिक स्वाभिमान जागवण्याच्या ऐतिहासिक प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. आत्मविश्वास हा देशाच्या मूळ आत्म्याशी आणि स्थानिक भाषांशी खोलवर जोडलेला असावा, या मूलभूत विश्वासाचा त्यांनी पुनरुच्चार केला. "भारताला जर आत्मविश्वासाने परिपूर्ण राष्ट्र बनायचे असेल, तर शिक्षण हे भारतीय आत्म्याशी जोडलेले असले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती," असे मोदीं यांनी सांगितले.

ऐतिहासिक शैक्षणिक विचारसरणी आणि आधुनिक धोरण यांची सांगड घालत, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्थानिक भाषांवर विशेष भर दिला असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आवर्जून केला. त्यांनी व्यवस्थेतील या आमूलाग्र बदलाकडे लक्ष वेधत, स्थानिक भाषांबाबत डॉ.मुखर्जींनी जे स्वप्न पाहिले होते, ते आमच्या सरकारने पूर्ण केले आहे," असे विश्वासाने सांगितले.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या उद्योगमंत्र्यांच्या आर्थिक दूरदृष्टीचा आढावा घेताना, त्यांनी चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स, सिंदरी खत प्रकल्प, दामोदर व्हॅली महामंडळ आणि आयएफसीआय यांसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्थापनेचा उल्लेख केला. देशाच्या रेल्वे, कृषी, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रांना अनेक दशके यशस्वीपणे चालना देत असल्याचे श्रेय त्यांनी या पायाभूत संस्थांना दिले. "त्यांनी अशा राष्ट्रीय संस्थांचा पाया घातला ज्या पुढील अनेक दशकांसाठी भारताचे आर्थिक सामर्थ्य बनल्या," असे निरीक्षण मोदी यांनी नोंदवले.

या विशाल पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक प्रकल्पांच्या उद्देशाचे पुनर्विश्लेषण करताना, त्याकडे केवळ कारखाने किंवा पदव्या देणारी केंद्रे म्हणून कधीच पाहिले गेले नाही हे पंतप्रधानांनी विषद केले. त्याऐवजी, जिथे संशोधन प्रयोगशाळा आणि औद्योगिक प्रकल्प हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित पवित्र स्थळे म्हणून कार्य करतात अशा प्रकारच्या सखोल विचारसरणीचे वर्णन त्यांनी केले,"त्यांच्यासाठी, ही सर्व राष्ट्र-उभारणीची साधना केंद्रे होती," असे उद्गार मोदी यांनी काढले.

या सर्वसमावेशक विकास विचारसरणीचा तपशील देताना गुणवत्तेला वाव देणाऱ्या, नाविन्याला चालना देणाऱ्या आणि पूर्ण आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित करणाऱ्या अशा प्रणालींची गरज त्यांनी अधोरेखित केली. भावी पिढ्यांसाठी एक सशक्त वारसा निर्माण करण्याची हीच भावना आजही राष्ट्राच्या प्रगतीच्या आधुनिक दृष्टिकोनाला चालना देत असल्याचा उल्लेख त्यांनी केला."हीच भावना आज विकसित भारतासाठी प्रेरणास्थान आहे," असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

युवा पिढीला कृतीशील होण्याचे जोरदार आवाहन करताना, त्यांना एकात्म राष्ट्रासाठीच्या ऐतिहासिक लढ्याचे रूपांतर सर्वोच्च राष्ट्रीय उत्कृष्टतेसाठीच्या आधुनिक मोहिमेत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. पूर्ण स्वावलंबन साध्य करण्याची मोठी जबाबदारी सामूहिकपणे स्विकारण्याचे आव्हान त्यांनी युवकांसमोर ठेवले. "आपल्याला विकसित भारताचा संकल्प सामूहिकरित्या साध्य करायचा आहे," असे मोदी ठामपणे म्हणाले.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा सल्ला देऊन आपल्या भाषणाचा समारोप करताना, प्रत्येक काम पूर्ण गांभीर्य, समर्पण आणि ते कार्य पूर्ण करण्याच्या निष्ठेने हाती घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सर्व सहभागींना त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांनी या आभासी कार्यक्रमाची सांगता केली. "कोणतेही काम तुम्ही सुरू केले तर ते संपूर्ण गांभीर्याने करा आणि ते अपूर्ण सोडू नका,"असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

माधुरी पांगे/निलीमा चितळे/राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/संदेश नाईक/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2281855) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Odia , Malayalam