संरक्षण मंत्रालय
वर्धा येथील एनसीसी कॅम्पजवळच्या विहिरीत 18 तास अडकलेल्या स्थानिक रहिवाशाची एनसीसी पथकाकडून सुटका
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2026 8:00PM by PIB Mumbai
नागपूर,6 जुलै 2026
वर्धा येथे कम्बाइन्ड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प (CATC-605) च्या कार्यालयाजवळील विहिरीत पडलेल्या स्थानिक नागरिकाला, नागपूरच्या क्रमांक 3 महाराष्ट्र (मुली) बटालियन एनसीसीच्या जवानांनी धैर्याने आणि प्रसंगावधान राखून वाचवले.

एका स्थानिक महिलेने 3 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता कॅम्प डेप्यूटी कमांडंट मेजर रिझू रावत यांची भेट घेतली आणि विहिरीतून मदतीसाठी आवाज ऐकू आल्याचे त्यांना सांगितले. वर्धा सेवाग्राम येथील रहिवासी आणि आपले शेजारी जीवन टाकसांडे (वय 55), विहिरीत पडले असल्याची माहिती त्या महिलेने दिली.

मेजर रिझू रावत यांनी तात्काळ कॅम्प कमांडंट लेफ्टनंट कर्नल प्रीती तिवारी यांना संबंधित घटनेची कल्पना दिली. सुभेदार मेजर चंद्र भान सिंग, हवालदार (नर्सिंग असिस्टंट) जंगले जी.बी, नायक (नर्सिंग असिस्टंट) गणेश आणि एमटीएस ड्रायव्हर विशाल यांच्यासह तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
कॅम्पवर उपलब्ध असलेल्या दोरखंड आणि सुरक्षा साधनांचा वापर करून बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ जवानांकडून रेस्क्यू ट्यूबदेखील मागवण्यात आली. जीवन टाकसांडे हे 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विहिरीत पडले होते, त्यांना सुमारे 18 तासांनी 3 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना एनसीसी कॅम्पमध्ये प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देण्यात आली.
एनसीसी कर्मचाऱ्यांमुळेच मला आज नवजीवन मिळाले आहे. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन करून विहिरीबाहेर काढले आणि माझे प्राण वाचवले. मी एनसीसी शिबिरातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो, अशा शब्दात टाकसांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
EWGF.jpeg)
प्रीती तिवारी यांनी या पथकाच्या तत्परतेचे आणि नि:स्वार्थ सेवेचे कौतुक केले. एनसीसीचे 'एकता आणि शिस्त' हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणारी ही घटना असल्याचे त्यांनी नमूद केले.
ही तत्पर बचाव मोहीम एनसीसीच्या राष्ट्र उभारणी आणि नियमित प्रशिक्षण उपक्रमांच्या पलीकडे जाऊन समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवते.
निलीमा चितळे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2281820)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English