पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत-जपान व्यापारी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

प्रविष्टि तिथि: 02 JUL 2026 9:48PM by PIB Mumbai

महामहीम, माझ्या कनिष्ठ भगिनी, पंतप्रधान ताकाईची

आपल्या दोन्ही देशांतील व्यापार धुरीण,

नमस्कार,

कोनिचिवा

भारत-जपान संयुक्त आर्थिक मंचावर तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहणे माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे.

येथे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्या गेल्या अनेक दशकांपासून भारताशी जोडलेल्या आहेत. यांच्यापैकी काही कंपन्या तर एका शतकाहून अधिक काळ भारताच्या वाटचालीचा भाग आहेत.

तसेच या मंचावर सहभागी होणाऱ्या आपल्या नव्या भागीदारांचे मी भारत-जपान यशोगाथेचा भाग झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारत-जपान नातेसंबंध खरोखरीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

आपल्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेकानेक उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

आत्ता काही वेळापूर्वीच आपण हरियाणातील खरखोडा येथील मारुती सुझुकीच्या नव्या उत्पादन कारखान्याचे उद्घाटन केले. आजघडीला सुझुकीच्या जगभरात निर्मित गाड्यांपैकी सुमारे दोन तृतीयांश गाड्यांचे उत्पादन भारतात होत आहे आणि त्या 100 देशांना निर्यात होत आहेत.

पंतप्रधान ताकाईची, मला असे सांगण्यात आले आहे की तुम्हाला मोटारसायकली खूप आवडतात. कावासाकी, यामाहा आणि होंडा या कंपन्यांनी भारतात तयार केलेल्या मोटारसायकली आज जगभरातील बाजारपेठांमध्ये निर्यात होत आहेत याचा आम्हांला अत्यंत आनंद आहे.

त्याचप्रमाणे, एअर कंडीशनर्स, पॉवर ग्रीड उपकरणे, अचूक उत्पादन प्रक्रिया असो किंवा वैद्यकीय तंत्रज्ञान, जेव्हा जपानची तज्ञता आणि गुंतवणूक, भारताचा वेग आणि प्रमाणासह एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा फायदा होतो.

मित्रांनो,

आज, पुरवठा साखळीतील व्यत्यय, व्यापारातील अनिश्चितता तसेच जागतिक मागणीतील मंदी अशा अनेक समस्यांशी जागतिक अर्थव्यवस्था झुंजत आहे.

मात्र, अशी एक म्हण आहे ना:

“जेव्हा परिस्थिती बिकट होते, तेव्हा खंबीर माणसे जिद्दीने पुढे जातात.”

भारत आता जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेली महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे.

गेल्या आर्थिक वर्षात, भारताने सकल राष्ट्रीय उत्पनाचा 7.7 टक्के विकासदर नोंदवला.

इतकेच नव्हे तर, गेल्या 12 वर्षांत, आम्ही काईझेन- म्हणजेच सातत्यपूर्ण सुधारणेच्या – तत्वज्ञानाचा स्वीकार करून भारताच्या आर्थिक डीएनए मध्ये परिवर्तन घडवून आणत आहोत.

केवळ काही महिन्यांपूर्वीच, आम्ही कररचना, शासनप्रणाली तसेच व्यापार करण्यातील सुलभता या क्षेत्रांमध्ये सुधारणांच्या नव्या पिढीची सुरुवात केली.

आम्ही अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्र खासगी क्षेत्राच्या अधिक जास्त सहभागासाठी खुले करत आहोत.

त्याचबरोबर, आम्ही अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रोत्साहनपर अनुदाने देऊन तुम्हा सर्वांना लाभदायक ठरतील अशा संधी निर्माण करत आहोत.

नेमके याच कारणामुळे, जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन (जेबीआयसी) ने आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार, सलग चौथ्या वर्षी भारताला जपानी उद्योगांसाठी सर्वात आश्वासक ठिकाण म्हणून स्थान देण्यात आले आहे.

आज, मी तुम्हा सर्वांसोबत एका नवीन उपक्रमाची माहिती सामायिक करू इच्छितो. पंतप्रधान कार्यालय एक विशेष 'जपान व्यवसाय सप्ताह' आयोजित करणार आहे. या उपक्रमादरम्यान, पंतप्रधान कार्यालयामधील वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी थेट संवाद साधतील, तुमच्या सूचना आणि समस्या ऐकून घेतील आणि भारतात अधिक जपानी गुंतवणूक तसेच भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने, व्यवसाय सुलभता आणखी वाढवण्यासाठी सखोल चर्चा करतील.

मित्रांनो,

आज, पंतप्रधान ताकाइची आणि मी, आपली भागीदारी आणखी गतिमान आणि सखोल करण्याचा संकल्प करत आहोत.

आम्ही आर्थिक सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये करार केले आहेत. हे करार भारत-जपान भागीदारीला भविष्यवेधी बनवतील आणि तिच्या शक्यता अक्षरशः अमर्याद करतील.

आपल्या दोन्ही सरकारांमध्ये धोरणात्मक समन्वय, परस्पर विश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पष्टता आहे.

आता या सामायिक दृष्टिकोनाला मूर्त परिणामांमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी तुमची आहे.

मित्रांनो,

पुढील दशकात भारतातील जपानी गुंतवणूक केवळ 10 ट्रिलियन येन या लक्ष्यापर्यंत पोहोचू नये तर तर ते उद्दिष्ट ओलांडावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

त्याचबरोबर, पुढील दहा वर्षांत भारतात कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट करण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत.

मित्रांनो,

मी तुमच्यासमोर एक दूरदृष्टी मांडू इच्छितो.

मी अशा जगाची कल्पना करतो, जिथे जपानचे तंत्रज्ञान आणि भारताची बाजारपेठेतील क्षमता एकत्र येऊन जगाला सेमीकंडक्टर, औषधनिर्माण आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रात सक्षम पुरवठा साखळी प्रदान करतील.

जिथे जपानचे भांडवल आणि भारताची महत्त्वाकांक्षा एकत्र येऊन जहाजबांधणी, गतिशीलता आणि स्वच्छ ऊर्जा यांमध्ये नवीन जागतिक नेतृत्व निर्माण करतील.

जिथे भारत आणि जपानच्या स्टार्टअप परिसंस्था एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात पुढील पिढीच्या जागतिक उपायांना चालना देतील.

आणि जिथे अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व सहकार्य आपल्याला जागतिक सुरक्षेसाठी आणखी भक्कम योगदान देण्यास सक्षम करेल.

मित्रांनो, 

चला आपण विश्वास आणि आशावादावर आधारित या भागीदारीच्या माध्यमातून परस्पर विकास आणि जागतिक कल्याणाचा मार्ग प्रशस्त करूया.

 टोयोटाच्या घोषवाक्याप्रमाणे, “चला, नव्या क्षितीजाकडे वाटचाल करु या”

आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.

***

 

SanjanaChitnis / ShraddhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280637) आगंतुक पटल : 3
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Telugu , Malayalam