आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या 16 व्या बैठकीदरम्यान 'ॲनेमिया मुक्त भारत अभियान'च्या कार्यान्वयन संबंधी मार्गदर्शक तत्वे केली जारी
'ॲनेमिया मुक्त भारत अभियान' मध्ये तपासणी, पाठपुरावा आणि निरंतर देखभाल सेवा बळकट करण्यासाठी 'T4' धोरणाचा (Test, Treat, Talk and Track - तपासणी, उपचार, संवाद आणि पाठपुरावा) अवलंब
सुधारित मार्गदर्शक तत्वांतर्गत ॲनेमिया संबंधित सेवांचे डिजिटल ट्रॅकिंग (निरीक्षण), विश्लेषण आणि नियोजनासाठी एक 'एकीकृत ॲनेमिया मुक्त भारत अभियान पोर्टल' स्थापन करण्यात येणार
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2026 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
ॲनेमियाविरोधात लढण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या 16 व्या बैठकीदरम्यान 'ॲनेमिया मुक्त भारत अभियान'च्या अंमलबजावणीविषयक मार्गदर्शक तत्वे जारी केली. यातून अभियानाची गेल्या आठ वर्षांतील सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते. तसेच देशभरात ॲनेमियाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक दिशा निश्चित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात ॲनेमिया मुक्त भारत'चे नाव बदलून 'ॲनेमिया मुक्त भारत अभियान'असे करण्यात आले हे बदल कार्यक्रमाच्या त्या व्यापक स्वरूपाचे निदर्शक आहेत, ज्यामध्ये केवळ पूरक आहार देण्याव्यतिरिक्त तपासणी, वैद्यकीय उपचार, योग्य आहार आणि 'जन चेतना'च्या माध्यमातून लोकसहभाग यांसारख्या बाबी समाविष्ट आहेत.

'ॲनेमिया मुक्त भारत अभियान' आणि सुधारित कार्यपद्धती मार्गदर्शक तत्त्वे यांचा उद्देश, सघन तपासणी, उपचार, पाठपुरावा आणि रुग्ण-केंद्रित व्यवस्थापन यांद्वारे ॲनेमियाच्या व्यवस्थापनाचा भर प्रतिबंधात्मक देखभाल कडून उपचारात्मक देखभालीकडे वळवणे हा आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विद्यमान 6x6x6 धोरणाचा विस्तार 7x7x7 आराखडामध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये सातवा लाभार्थी गट, सातवा हस्तक्षेप आणि सातवी संस्थात्मक यंत्रणा समाविष्ट करण्यात आली आहे. ॲनेमियाचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले चक्र तोडण्याची सुरुवात लवकरात लवकर झाली पाहिजे, हे ओळखून कमी वजनाच्या (0-6 महिने) बाळांचा सातव्या लाभार्थी गटात समावेश करण्यात आला आहे. लोहयुक्त आणि विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचे दैनंदिन आहारात सेवन करण्यास प्रोत्साहन देणारा 'योग्य आहार' हा दृष्टिकोन सातवा हस्तक्षेप म्हणून सादर करण्यात आला आहे. डिजिटल ट्रॅकिंगसाठी एक अधिक मजबूत देखरेख आणि मूल्यमापन आराखडा ही सातवी संस्थात्मक यंत्रणा आहे.

या अभियानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य T3 दृष्टिकोनाकडून (चाचणी, उपचार, संवाद) T4 दृष्टिकोनाकडे (चाचणी, उपचार, संवाद, मागोवा) झालेले संक्रमण हे आहे. यामध्ये सखोल चाचण्या, ॲनेमिया व्यवस्थापन नियमावलीनुसार लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनेमियावर उपचार करणे, आणि योग्य आहारासाठी विशेष समुपदेशनासह पुढील उपचारांसाठी व पाठपुराव्यासाठी लाभार्थ्यांचा मागोवा घेणे याचा समावेश आहे.
सुधारित मार्गदर्शक तत्त्वे ॲनेमिया सेवांचा मागोवा घेण्यासाठी एक मजबूत डिजिटल परिसंस्था स्थापित करतात.

ॲनेमिया मुक्त भारत अभियान ॲनेमियाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आणि त्याला एक आंतर-क्षेत्रीय प्राधान्य देण्यासाठी, आंतर-मंत्रालयीन आणि विविध स्तरावर समन्वय साधणाऱ्या 'संपूर्ण सरकार ' दृष्टिकोनाचे समर्थन करते.

* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279229)
आगंतुक पटल : 6