माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


आरोग्य, निरामयता आणि निरोगी वृद्धत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांकडून योग सत्रांचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2026 5:19PM by PIB Mumbai

 

नागपूर येथील विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांमध्ये 21 जून 2026 रोजी 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांनी आयोजित केलेल्या योग सत्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. यंदाच्या निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेनुसार हे आयोजन करण्यात आले. आरोग्य, चैतन्य आणि एकूणच निरामयता टिकवून ठेवण्यासाठी योगचा आयुष्यभर अंगिकार करण्याचे महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले.

शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता आणि भावनिक संतुलन यांना प्रोत्साहन देऊन प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमधील योगसाधनेचे  योगदानही या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले. या निमित्ताने अनेक शासकीय संस्थांनी योग कार्यक्रम आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन केले. तसेच नियमित योगाभ्यासाच्या माध्यमातून अधिक निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित करण्यात आले. नागपूर येथील विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांची ठळक वैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर

भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (आयआयएम नागपूर) येथे 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. डॉ. संजय अरोरा यांनी योग सत्राचे संचालन केले. त्यांनी सहभागीना विविध योगासने, श्वसनाचे व्यायाम आणि सजगता अभ्यासाचे मार्गदर्शन केले. अधिष्ठाता (प्राध्यापक व शैक्षणिक) डॉ. प्रशांत गुप्ता यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर पाहुणे आणि इतर सहभागी या कार्यक्रमात सहभागी झाले. तर, संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी आभासी माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित केले.

  

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमी, नागपूर

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  अकादमी, नागपूर येथे 21 जून 2026 रोजी सुरादेवी आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. एनडीआरएफ अकादमीचे संचालक ब्रिगेडियर आर. सत्य नारायणन यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना योग हा  दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन केले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या प्रशिक्षित पथकाने योग सत्राचे संचालन केले.

 

भारतीय खाण ब्युरो

भारतीय खाण ब्युरो  मुख्यालयात 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या विषयाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या योग सत्रामध्ये विविध श्वसन व्यायाम आणि योगासनांचा समावेश होता. भारतीय खाण ब्युरोचे महासंचालक पंकज कुलश्रेष्ठ यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मुख्य खाण नियंत्रक (एमडीआर) डॉ. वाय. जी. काळे, मुख्य खाण भूवैज्ञानिक  एस. के. अधिकारी, खाण नियंत्रक  बी. एल. गुर्जर आणि खाण नियंत्रक (एमटीएस)  पुष्पेंद्र गौर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भारतीय वायुसेना, देखभाल कमांड मुख्यालय

भारतीय वायुसेनेच्या नागपूर येथील देखभाल कमांड मुख्यालयात 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. देखभाल कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल यल्ला उमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या सामायिक योग प्रोटोकॉलनुसार आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक योग सत्रामध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

 

उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्र

उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्रांत 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. देवळाली, कामठी, अहमदाबाद, वडोदरा, भुसावळ आणि नागपूर येथील लष्करी तळांवर योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  संरक्षण दलातील कार्यरत कर्मचारी, माजी सैनिक, नागरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. नागपूर येथे भारतीय सैन्यदल आणि भारतीय वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने सीताबर्डी किल्ल्यावर योग सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सहभागीांनी विविध योगासने, श्वसन व्यायाम आणि ध्यान तंत्रांचा सराव केला.

 

एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमी, कामठी

एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमी, कामठी येथे 21 जून 2026 रोजी निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी, कनिष्ठ आयोगित अधिकारी, प्रशिक्षक आणि 559 कॅडेट प्रशिक्षण अधिकारी प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. योगाभ्यासाच्या माध्यमातून निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या अकादमीच्या बांधिलकीचे या सहभागातून प्रतिबिंब दिसून आले.

 

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड तर्फे 21 जून 2026 रोजी नागपूर येथील डब्ल्यूसीएल मुख्यालयाच्या इंदोरा परेड मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष आणि सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये कार्यकारी संचालक, मुख्य दक्षता अधिकारी, संचालन समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि योग साधक सहभागी झाले. जल प्रहरी म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मश्री डॉ. उमा शंकर पांडे  प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते  आणि त्यांनी सहभागींसमवेत योग सत्रात सहभाग घेतला.

  

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ

कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात 21 जून 2026 रोजी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक, नागपूर आणि रत्नागिरी येथील परिसरांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नागपूर येथे प्रा. राधिका वझलवार, रामटेक येथे प्रा. सुजाता द्रव्याकर तसेच रत्नागिरी येथे प्रा. अविनाश चव्हाण आणि प्रा. काश्मिरा दळी यांनी योग सत्रांचे संचालन केले. यावेळी अधिष्ठाता प्रा. ललिता चंद्रात्रे, रामटेक परिसर संचालक प्रा. हरिकृष्ण अगस्ती, कार्यक्रम समन्वयक प्रा. कलापिनी अगस्ती आणि कुलसचिव डॉ. रोशन अलोणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ, नागपूर परिसर

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू), नागपूर  कॅम्पसने  21 जून 2026 रोजी नागपूर येथील आयटी पार्क, सुभाष नगर येथील परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला . परिसर संचालक प्रा. एस. ओ. जुनारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सह अधिष्ठाता डॉ. निरज कुमार सिंह, सहाय्यक कुलसचिव चेतना तिडके, प्राध्यापकवर्ग आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात सहभाग घेतला.

 

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र , नागपूर

संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र , नागपूर येथे 21 जून 2026 रोजी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक सोपान आवचार आणि एससीझेडसीसीचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम)  दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते योग सत्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सदस्य तसेच नागरिकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात सहभाग घेतला. याशिवाय, खजुराहो येथील पश्चिम मंदिर समूहातही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी एससीझेडसीसीच्या संचालिका आस्था कार्लेकर, पखवाज गुरु चित्रांगना आगळे-रेशवाल, पखवाज कार्यशाळेतील सहभागी तसेच शिल्पग्रामचे कर्मचारी यांनी योग सत्रात सहभाग घेतला.

 

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात 21 जून 2026 रोजी मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पने अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

योग प्रशिक्षक संगीता सोमणकर यांनी योग सत्राचे संचालन केले. त्यांनी सहभागीांना सामायिक योग नियमानुसार विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे समन्वयन सहाय्यक प्राध्यापक डॉ. संदीप सपकाळे यांनी केले, तर शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे पदसिद्ध सचिव डॉ. निशीथ राय यांनी आभार मानले.

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक कार्यालय, नागपूर

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात 21 जून 2026 रोजी निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रादेशिक कार्यालय तसेच त्याच्या प्रकल्प अंमलबजावणी घटकांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. योग प्रशिक्षक सतीश जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यांनी सहभागीना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान पद्धतींचे मार्गदर्शन केले. एनएचएआयच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक) आशुतोष पिंपळे यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

नागपूर शहर टपाल विभाग

नागपूर शहर टपाल विभागात 21 जून 2026 रोजी नागपूर मुख्य टपाल कार्यालयात निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. दीपक चवणे आणि  स्वाती चवणे यांनी योग सत्राचे संचालन केले. त्यांनी सहभागीांना योग आणि ध्यान पद्धतींचे मार्गदर्शन केले. नागपूर विभागाचे टपाल सेवा संचालक डॉ. सुधीर जाखेरे, नागपूर शहर विभागाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक एच. सरथ कुमार, नागपूर मेल मोटर सेवेचे व्यवस्थापक रजत हेडाऊ, नागपूर आरएमएस एफ विभागाचे वरिष्ठ रेल्वे मेल व्यवस्थापक (एसआरएम) जी. बी. आंभोरे, नागपूर मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर सुजितकुमार लांडगे आणि नागपूर शहर प्रधान टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्टमास्तर विलास भोगे यांच्यासह टपाल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

***

सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2276369) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English