श्रम आणि रोजगार मंत्रालय
पंतप्रधानांकडून देशातील 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 'पीएम-व्हीबीआरवाय' अंतर्गत ₹ 2,400 कोटींचे वितरण
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या नेतृत्वात गोव्यात प्रादेशिक कार्यक्रम संपन्न; नवनियुक्त कामगारांना नियुक्ती पत्रांचे वाटप
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2026 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी 'पीएम-व्हीबीआरवाय' योजनेअंतर्गत देशातील 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना ₹2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्याचे वितरण केले.

'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' ('पीएम-व्हीबीआरवाय') अंतर्गत देशव्यापी मोहिमेचा एक भाग म्हणून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ), प्रादेशिक कार्यालय, पणजी यांच्या वतीने गोव्यातील 'सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी', या "वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था येथील 'एस.झेड. कासिम हॉल' मध्ये आज एका विशेष प्रादेशिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोव्यातील या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे आणि अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त जय कुमार हे देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना श्रीपाद येसो नाईक यांनी, देशभरात आणि विशेषतः गोव्यात होत असलेले 'पीएम-व्हीबीआरवाय' योजनेचे नियोजन आणि तिच्या अंमलबजावणीचे कौतुक केले. त्यांनी सर्व भागधारकांना या योजनेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आणि नियोक्त्यांना रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले.

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, 'ऑन-द-जॉब' (काम करता करता शिकण्याची पद्धत) शिक्षण पद्धतीद्वारे (लर्निंग अप्रोच) औपचारिक अर्थव्यवस्थेत पूर्णपणे समाविष्ट होण्यासाठी लाभार्थ्यांनी आपला रोजगार किमान सहा महिने टिकवून ठेवणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती आणि कार्यबलातील सहभाग हे 'विकसित भारत 2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान नियोक्त्यांच्या हस्ते नवनियुक्त कामगारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ घेतलेल्या नियोक्त्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात आपले अनुभव सांगितले. पारदर्शक आणि सर्वसमावेशक रोजगार-संलग्न प्रोत्साहन योजना (एम्प्लॉयमेंट-लिंक्ड इन्सेन्टिव्ह स्कीम) सुरू केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

या सोहळ्याला विविध भागधारक, लाभार्थी, नियोक्ते, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2275496)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English