संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस चिल्का येथे बॅच 01/26 ची पासिंग आऊट परेड

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 7:38PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र 'आयएनएस चिल्का' येथे 12 जून 2026 रोजी एका अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक सोहळ्याची नोंद झाली. तब्बल 16 आठवड्यांचे खडतर आणि मूलभूत नौदल प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून, 'बॅच 01/26' मधील 3,011 प्रशिक्षणार्थी सैनिकांचा दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या दिमाखदार संचालनाने हे उमेदवार देशसेवेसाठी सज्ज, शिस्तप्रिय, प्रेरित आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम नौसैनिक बनले.
विशेष म्हणजे या यशस्वी तुकडीमध्ये 2,746 अग्निवीरांचा समावेश होता, ज्यामध्ये भारतीय नौदलाच्या 116 महिला अग्निवीरांनीही आपला ठसा उमटवला. सोबतच, भारतीय तटरक्षक दलाच्या 265 नाविकांनीही आपले प्रशिक्षण पूर्ण करून यात सहभाग घेतला होता. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि नौदलातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे सर्व वीर आता पूर्णपणे सज्ज आहेत.
पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन या दीक्षांत संचलन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या परेडची पाहणी केली. तर 'आयएनएस चिल्का'चे स्टेशन कमांडर बी. दीपक अनिल यांनी या संचलनाचे संचालन केले. या दिमाखदार सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित माजी सैनिक, वरिष्ठ अधिकारी, नामवंत व्यक्ती आणि उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते; यावेळी संपूर्ण वातावरणात एक वेगळाच जिव्हाळा आणि अभिमानाची भावना अनुभवास आली.
उपस्थितांना संबोधित करताना, व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी हा आव्हानात्मक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. भारतीय नौदलाची मूळ मूल्ये असलेल्या 'कर्तव्य, सन्मान आणि शौर्य' यांचे सदैव जतन करण्याचे आवाहन त्यांनी सैनिकांना केले, तसेच संपूर्ण समर्पण, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेने देशाची सेवा करण्याचा मोलाचा संदेश दिला.
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत प्रशिक्षणार्थींना मुख्य अतिथींच्या हस्ते पदके, चषक आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात 'चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ रोलिंग ट्रॉफी' आणि सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचे सुवर्ण पदक 'एसएसआर' साठी कोर्णाना धनलक्ष्मी हिला, तर 'एमआर' साठी ऋषिकेश मारुती पवार याला प्रदान करण्यात आले. एकूण गुणवत्ता यादीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थीची रोलिंग ट्रॉफी प्राप्ती रमेश चव्हाण हिला देण्यात आली, तर देवाशिष याला सर्वोत्तम नाविक म्हणून घोषित करण्यात आले.
दीक्षांत संचलनापूर्वी एक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सत्राचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आणि प्रशिक्षणार्थींनी उत्साही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा 'ओव्हरऑल चॅम्पियनशिप चषक' खारवेल डिव्हिजनला मिळाला, तर आंग्रे डिव्हिजनने उपविजेतेपद पटकावले. याच सोहळ्यात 'अंकुर (01/26)' या 'आयएनएस चिल्का'च्या द्विभाषिक प्रशिक्षणार्थी मासिकाचे अनावरणही करण्यात आले. या मासिकात प्रशिक्षणार्थींचे अनुभव, त्यांच्या यशाची शिखरे आणि आयएनएस चिल्का येथील 16 आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यानचा त्यांचा खडतर व कौतुकास्पद प्रवास मांडण्यात आला आहे.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272558) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी