रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

झोजिला बोगदा प्रकल्पात ऐतिहासिक यश, झोजिला बोगदा केवळ एक परिवहन प्रकल्प म्हणून मर्यादित नसून या क्षेत्राच्या विकासासाठी एक प्रवेशद्वार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल- नितीन गडकरी

प्रविष्टि तिथि: 09 JUN 2026 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज करगिल जिल्ह्यातल्या मिनामार्ग इथल्या, झोजिला बोगदा प्रकल्पाच्या, मुख्य बोगद्याच्या पूर्व बाजूला, बोगद्याच्या दोन्ही बाजू जोडल्या जाण्याच्या  ऐतिहासिक प्रसंगाची पाहणी केली. या कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. लदाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते. झोजिला बोगदा प्रकल्पातील या महत्वपूर्ण टप्प्याच्या यशाची त्यांनी प्रशंसा केली.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी देशाच्या  रस्ते उभारणीतील  पायाभूत सुविधांच्या विकासातील एक मोठा टप्पा ठरली असून, यामुळे जम्मू-काश्मीर आणि लदाख यांच्यात वर्षभर संपर्क व्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दिशेने देशाने आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे.  झोजिला बोगदा केवळ एक परिवहन प्रकल्प म्हणून मर्यादित नसून या क्षेत्राच्या विकासासाठी एक प्रवेशद्वार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

झोजिला बोगदा: अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी

राष्ट्रीय महामार्ग क्र. 1 वर, बालताल आणि मिनामार्ग या दरम्यान उभारण्यात येत असलेला, 14 किलोमीटर लांबीचा आणि दुहेरी मार्ग असलेला झोजिला बोगदा, हा, देशातील सर्वात महत्वाकांक्षी पर्वतीय पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे. अंदाजे 6,800 कोटी रुपये खर्चून या बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे. 2,900  ते 3,310 मीटर उंचीवर निर्मित हा प्रकल्प, जगातील अत्यंत आव्हानात्मक भूप्रदेशांपैकी एक अशी गणना झालेल्या ठिकाणी साधण्यात आलेले अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण यश आहे.

प्रचंड हिमवृष्टी, प्रतिकूल हवामान आणि गुंतागुंतीची भौगोलिक आव्हाने असूनही, अभियंते, कामगार, सल्लागार, कंत्राटदार, तसंच,  राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ  आणि अन्य सहभागींच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प सातत्याने प्रगती करत आहे. या यशस्वी वाटचालीशी संबंधित असलेल्या सर्वांचे  गडकरी यांनी अभिनंदन केले.

सुरक्षेची अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा

या बोगद्यात आधुनिक वायुवीजन प्रणाली, आगीचा शोध घेणारी स्वयंचलीत यंत्रणा, अत्याधुनिक सी सी टी व्ही द्वारे देखरेख तसेच,  पादचाऱ्यांना सुरक्षित आणि जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी क्रॉस-पॅसेज अर्थात आंतर-रस्ते सुविधा उपलब्ध असतील, असे गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.

बर्फाचे थर आणि भूगर्भीय आव्हानांना तोंड देण्यासाठी या प्रकल्पात आठ ठिकाणी, 'कट अँड कव्हर' विभाग, चार पूल,  स्नो गॅलरीज,  हिमस्खलनापासून संरक्षण देणारी बांधकामे, पोहोच रस्ते आणि अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीर आणि लदाखमधील दळणवळण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या योजना नितीन गडकरी यांनी ठळकपणे  अधोरेखित केल्या.


सोनाली काकडे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2270957) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu