श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईएसआयसीची देशभरात केंद्रीकृत ऑनलाइन रुग्ण अभिप्राय यंत्रणा सुरू
स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि औषध उपलब्धतेवर आता रुग्ण देणार थेट अभिप्राय; कमी गुणांकन मिळताच तातडीने होणार कारवाई
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2026 5:11PM by PIB Mumbai
पणजी-गोवा, 9 जून 2026
रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उत्तरदायी बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) देशभरातील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये केंद्रीकृत ऑनलाइन रुग्ण अभिप्राय यंत्रणा सुरू केली आहे.
या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीमुळे विमाधारक व्यक्ती आणि लाभार्थी यांना त्यांच्या आरोग्यसेवा मिळाल्याबाबत अभिप्राय नोंदविणे, समस्या मांडणे आणि सेवा सुधारण्यासाठी सूचना देणे अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः रुग्णालयातील स्वच्छता, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि औषधांची उपलब्धता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर नागरिकांचा थेट अभिप्राय मिळणार आहे.
अधिकाधिक लाभार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ईएसआयसीने अभिप्राय नोंदविण्याचे विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ईएसआयसीच्या ‘धन्वंतरी’ प्रणालीद्वारे सेवा घेतल्यानंतर संबंधित लाभार्थ्याला एसएमएसद्वारे थेट लिंक पाठविली जाईल. तसेच रुग्णालये आणि बाह्यरुग्ण विभागांमध्ये लावण्यात आलेल्या बहुभाषिक QR कोड पोस्टर्सद्वारेही अभिप्राय देता येणार आहे. याशिवाय ईएसआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ही प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ओटीपीद्वारे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. तसेच एकाच व्यक्तीकडून वारंवार अभिप्राय नोंदविला जाणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. देशातील विविध भाषिक लाभार्थ्यांना सहज वापरता यावे यासाठी बहुभाषिक सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.
रुग्णांच्या अभिप्रायावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी मुख्यालय, प्रादेशिक कार्यालये आणि स्थानिक आरोग्य सुविधा स्तरावर स्वतंत्र डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही सेवेला 3 पेक्षा कमी गुणांकन मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना पाठविली जाईल. त्यामुळे आवश्यक सुधारणा जलदगतीने करता येणार आहेत.
याशिवाय, सर्व आरोग्य सुविधांच्या कामगिरीचे मूल्यांकन आणि क्रमवारी निश्चित करण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये उपलब्ध असून त्यामुळे सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा, निरोगी स्पर्धा आणि संस्थात्मक उत्तरदायित्वाला चालना मिळणार आहे.
देशातील कामगार वर्गाला अधिक दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुनर्प्रचिती देत ईएसआयसीने हा अभिनव उपक्रम सुरू केला असून, “ईएसआयसी – अधिक चांगल्या आरोग्यसेवेसाठी कटिबद्ध” हे ब्रीदवाक्य अधिक प्रभावीपणे साकार केले आहे.

स्त्रोत – ईएसआयसी,गोवा | पीआयबी पणजी | अंबादास यादव/ /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2270777)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English