भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राकडून विज्ञान, शाश्वतता आणि सामुदायिक कृतीद्वारे जागतिक पर्यावरण दिन 2026' साजरा


हवामान जागरूकता, वैज्ञानिक कार्यक्रम आणि 'एक पेड माँ के नाम' वृक्षारोपण मोहिमेत 400 हून अधिक जणांचा सहभाग

प्रविष्टि तिथि: 07 JUN 2026 6:35PM by PIB Mumbai


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था, 'राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या (NCPOR) वतीने गोव्यात वास्को येथील परीसरामध्ये 'जागतिक पर्यावरण दिन 2026' साजरा करण्यात आला. या निमित्ताने वैज्ञानिक तसंच शाश्वततेचे उपक्रम आणि सामुदायिक सहभागाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याच्या माध्यमातून ध्रुवीय आणि महासागर विज्ञानातील 'एनसीपीओआर'च्या कार्याची माहिती देण्यात आली , त्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाविषयी ठोस उपाययोजना आणि शाश्वत जीवनशैलीच्या महत्त्वावरही विशेष भर देण्यात आला.

'गोवा स्टेट रिसर्च फाउंडेशन' (GSRF) चे अध्यक्ष प्रा. एम. के. जनार्थनम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी यावेळी "पर्यावरण आणि शाश्वतता" या विषयावर बीजभाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला, तसेच सामूहिक कृती आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या 'शाश्वत विकास उद्दिष्टांना' (SDGs) गती देण्याचे आवाहन केले.

'एनसीपीओआर'चे (NCPOR) संचालक डॉ. थंबन मेलॉथ यांनी यावेळी बोलताना, हवामान बदल समजून घेण्यासाठी आणि भारताची पर्यावरणीय लवचिकता  बळकट करण्यासाठी ध्रुवीय संशोधनाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. जागतिक पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान, नाविन्यता आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दिल्ली विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आणि 'एनसीपीओआर'चे सल्लागार प्रा. नरेश चंद्र पंत यांनी या कार्यक्रमात एक विशेष व्याख्यान दिले. शाश्वत विकासासाठी भू-वैज्ञानिक दृष्टिकोनात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी, पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांच्या योग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे 'सायन्स ऑन अ स्फीअर' (Science on a Sphere) हे विशेष सत्र. या सत्रात उपस्थितांना महासागर, वातावरण, हवामान प्रणाली आणि ध्रुवीय प्रदेश गतिमान दृश्यांच्या माध्यमातून  अनुभवता आले. जागतिक पर्यावरणीय प्रक्रियांबद्दलचे सामान्य जनतेचे  आकलन यामुळे वृद्धिंगत झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मिशन लाईफ' (Mission LiFE) या संकल्पनेतून प्रेरित होऊन देशभरात राबवली जाणारी 'एक पेड माँ के नाम' ही मोहीमही या कार्यक्रमादरम्यान 'एनसीपीओआर'ने आयोजित केली होती. संचालक डॉ. थंबन मेलॉथ यांनी पहिले रोप लावून या मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर संस्थेतील वैज्ञानिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि पाहुण्यांनी मिळून 100 हून अधिक रोपे लावली.
या कार्यक्रमात गोव्यातील 35 वेगवेगळ्या संस्थांमधील सुमारे 100 प्रतिनिधी आणि 'एनसीपीओआर'चे 300 हून अधिक वैज्ञानिक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

***

निलिमा चितळे/वैभवी जोशी/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(रिलीज़ आईडी: 2270110) आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English