भूविज्ञान मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारताच्या सातव्या प्रादेशिक हवामान केंद्राचे जम्मूमध्ये उद्घाटन
जम्मू-कश्मीर, लदाख आणि हिमाचल प्रदेशासाठी जिल्हास्तरीय हवामानाचा अंदाज आणि आकस्मिक पूर व पर्वतीय भागातील हवामानविषयक अधिक खात्रीशीर इशारे देण्यासाठी केंद्र
प्रविष्टि तिथि:
05 JUN 2026 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2026
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज जम्मूमध्ये नव्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन केले, त्याचबरोबर लवकरच लखनौ इथे असे एक केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. यामुळे भारतात प्रादेशिक हवामान अंदाज देणाऱ्या केंद्रांची व्याप्ती वाढणार आहे.
जम्मू स्थित केंद्र हे देशातील सातवे प्रादेशिक हवामान केंद्र असून ते जम्मू-कश्मीर, लदाख आणि हिमाचल प्रदेशाला सेवा देईल. हिमालयातील प्रदेशाच्या गरजांनुसार विशेष हवामान सेवा, आपत्तीविषयक इशारे आणि हवामानविषयक सहाय्य पुरविण्याचे कार्य हे केंद्र करणार आहे.
हे नवे केंद्र मैदानांपासून ते उंच पर्वतीय क्षेत्रांपर्यंत विविध प्रकारचा भूभाग असलेल्या हिमालयाच्या प्रदेशात हवामान निरीक्षण, अंदाज व पूर्वसूचना प्रणालीला बळकटी देईल, असे सिंह यांनी यावेळी सांगितले. हे केंद्र जिल्हास्तरीय हवामानाचा अंदाज, पर्वतीय भागांसाठी हवामानाचा अंदाज, पर्यटनविषयक सूचना, शहरनिहाय हवामान सेवा तसेच आकस्मिक पूर (फ्लॅश फ्लड्स), ढगफुटी, हिमस्खलन, अति बर्फवृष्टी, मेघगर्जनेसह वादळे आणि भूस्खलन यांचे इशारे देईन. या सेवांचा लाभ अमरनाथ आणि वैष्णो देवी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना, शेतकऱ्यांना, वाहतूक क्षेत्राला, जलविद्युत प्रकल्पांना, आपत्ती व्यवस्थापन संस्थांना आणि कठीण भूभागात कार्यरत सुरक्षा दलांना होईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या दशकात जम्मू-काश्मीर आणि लदाखमधील हवामानविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की 2014 मध्ये या प्रदेशात एकही डॉप्लर तंत्रज्ञानावर आधारित हवामान रडार नव्हता. आता मात्र, जम्मू, श्रीनगर, लेह आणि बनिहाल टॉप या ठिकाणी मिळून 4 डॉप्लर हवामान रडार कार्यरत आहेत. ‘मिशन मौसम’ अंतर्गत अनंतनाग, राजौरी, बारामुल्ला, किश्तवाड आणि डोडा इथे आणखी 5 डॉप्लर रडार उभारण्याचा प्रस्ताव आहे.
निरीक्षण यंत्रणेचाही मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. सध्या या प्रदेशात 56 वेधशाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये थेट मनुष्यबळाचा वापर करणाऱ्या 15 वेधशाळा, 25 स्वयंचलित हवामान केंद्रे आणि 16 स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे यांचा समावेश आहे. 2014 मध्ये 13 स्वयंचलित हवामान केंद्रे आणि 14 स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत होती. अलीकडेच कारगिल, रामबन जिल्ह्यातील उखराल आणि माता वैष्णो देवी भवन इथे स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात अशी आणखी सुमारे 8; तर 5 स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. दैनंदिन पर्जन्यमान निरीक्षण योजनेअंतर्गत कार्यरत केंद्रांची संख्या 2014 मधील 30 वरून आता 85 इतकी झाली आहे. त्यामुळे पर्जन्यमानाचे निरीक्षण आणि हवामान अंदाज क्षमतांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.




* * *
राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269436)
आगंतुक पटल : 19