पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्याकडून इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसचा सातत्यपूर्ण पुरवठा सुरू, ग्राहकांना घाबरून जात खरेदी न करण्याचे पुन्हा आवाहन

Posted On: 31 MAY 2026 8:30PM by PIB Mumbai

पणजी/गोवा, 31 मे 2026
 

 

विद्यमान भू-राजकीय परिस्थितीतही, देशभर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) सतत उपलब्ध राहील, याची काळजी- इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या घेत आहेत. या कंपन्यांची टर्मिनल्स, डेपोज, पाइपलाइन्स, सिलेंडरमध्ये एलपीजी भरणारे प्रकल्प आणि किरकोळ विक्री-केंद्रे या साऱ्यांच्या व्यापक जाळ्याच्या माध्यमातून हे साध्य केले जात आहे.
अडथळाविरहित पद्धतीने पुरवठा होत राहावा, यासाठी ओएमसी राज्य सरकारांबरोबर आणि स्थानिक प्रशासनांबरोबर समन्वय साधून काम करत आहेत. विविध बाजारपेठांमध्ये इंधनाचा पुरवठा वेळेवर होत राहावा, यासाठी पुरवठा पथके, वाहतूक नेटवर्क्स, टर्मिनल कामकाज, आणि निवडक किरकोळ विक्री-केंद्रे चोवीस तास कार्यरत आहेत.

घरगुती वापरासाठी एलपीजीचा 100 टक्के पुरवठा करण्याची काळजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या घेत असून, त्या दृष्टीने त्यांनी उपाययोजनाही केल्या आहेत- जसे की-- तेलशुद्धीकरण उत्पादनात वाढ, तसेच पुरवठा व्यवस्थापनास बळकटी आणण्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देणे. रुग्णालये, शिक्षणसंस्था, औषधनिर्मिती केंद्रे, शेती आणि अन्य अत्यावश्यक उद्योग यांच्या व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यास प्राधान्य दिले जात आहे.
गोव्यात, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांतून होणाऱ्या डिझेलच्या विक्रीत सर्वसामान्य कामकाजामुळे होणाऱ्या वाढीच्या तुलनेत 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदली गेली आहे. प्रामुख्याने, घाऊक ग्राहकांऐवजी किरकोळ माध्यमातून खरेदी करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने ही वाढ दिसून येत आहे.

साठेबाजी, काळा बाजार, अनधिकृत साठवण, आणि पेट्रोलियम उत्पादनांचा वेगळ्या कारणाने होणारा वापर टाळण्यासाठी त्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आवाहन, भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे. केवळ अधिकृत माध्यमांतूनच डिझेल खरेदी करण्याचा सल्ला उद्योग-महासंघांना देण्यात आला आहे.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, विना-व्यत्यय पुरवठा सुरु राहावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत, असे सांगून सार्वजनिक क्षेत्रातील तेल उद्योगांनी ग्राहकांना निश्चिन्त केले आहे.

नागरिकांनी त्यांच्या सर्वसामान्य पद्धतीनेच खरेदी करावी, धास्तावून किंवा घाबरून खरेदी करण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, इंधन उप्लब्धतेविषयी अचूक माहिती मिळण्याकरिता ग्राहकांनी केवळ अधिकृत संस्थांकडून व तेल विपणन कंपन्यांकडून होणाऱ्या अधिकृत महितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राधिका अघोर/जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2267326) अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein: English